प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.

प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. संतुर वाद्याला संगीत विश्वात वेगळी ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि मुलगा राहुल शर्मा आहेत. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख होती. पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.

पंडित शिवकुमार शर्मा हे उत्तम गायकही होते. १९५६ साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या गाण्याला संगीत दिलं होतं. १९६७ साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतरानं खूपच प्रसिद्ध झाली. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीनं त्यांनी काही चित्रपटांना संगीतसुद्धा दिलं. त्याची सुरुवात १९८० साली ‘सिलसिला’ चित्रपटापासून झाली.

या काळात या जोडगोळीने ‘शिव-हरी’ या नावानं संगीत दिलं होतं. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, फासले (१९८५), चाँदनी (१९८९), लम्हे (१९९१), डर (१९९३) हे आहेत.

अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीत विश्वात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय सिनेसंगीतातही फार मोठी कामगिरी बजावली आहे. .

हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावाने ओळखली जायची. १९६७ मध्ये ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा अल्बम तुफान लोकप्रिय झाला होता. या अल्बममध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली

पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांना नाही, तर जगाला भूरळ घातली. जम्मू काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहचले आहे, तिथे संतूर पोहचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पंडित शिवकुमार शर्मा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ संतूर वादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांचे आकस्मिक जाणे धक्कादायक आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्य तसेच भारतीय शास्त्रीय संगीत आपल्या अद्भुत अदाकारीने जागतिक स्तरावर नेले. चिंतनशील असलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी आपल्या वादनातून शास्त्रीय संगीतात नवनवे प्रयोग यशस्वी करून दाखविले.

एक महान कलाकार, श्रेष्ठ गुरु, संशोधक आणि सुहृद व्यक्ती असलेल्या शिवकुमार शर्मा यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले आणि संगीत विश्व समृद्ध केले. पं. शर्मा यांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे सुपुत्र पंडित राहुल शर्मा तसेच इतर कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


हेही वाचा – ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला