शुक्रवारी सर्वत्र थिएटरमध्ये छावा सिनेमाने मोठी डरकाळी फोडली. अॅडव्हान्स बुकिंगपासूनच हा सिनेमा कमाईचा मोठा आकडा गाठणार हे समजत होतं. पण पहिल्याच दिवशी आणि विकेंडला स्वराज्याच्या धाकल्या धनींचा इतिहास पाहण्यासाठी जमलेली प्रेक्षकांची गर्दी पाहून डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं. एक भव्य आणि दिव्य असा हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर भाष्य करतोय. सिनेमातील दृश्य, संवाद, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना इतका भावला की दिवसागणिक सिनेमाच्या तिकिटांची विक्री वाढताना दिसतेय. दरम्यान, या सिनेमात अत्यंत महत्वाच्या भूमिकेत झळकलेल्या संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत आली आहे. पाहूया तो काय म्हणालाय? (Santosh Juvekar shared special post for Chhaava audience)
संतोष जुवेकरची पोस्ट
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकले आहेत. ज्यामध्ये अभिनेता संतोष जुवेकरचा देखील समावेश आहे. या सिनेमात त्याने ‘रायाजी’ ही अत्यंत महत्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमाला दिवसेंदिवस मिळणार प्रतिसाद पाहून अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
ज्यात तिने लिहिलंय, ‘मला ह्या आकड्यापेक्षा प्रत्येक सिनेमागृहातल्या माझ्या मायबाप प्रेक्षकांचा आकडा बघायला आणि ऎकायला आवडेल. माझ्या धाकल्या धनिना बघायला आणि समजून घ्यायला येणाऱ्या माझ्या भगव्या रक्ताचा कल्लोळ झाला पाहिजे. जय भवानी! जय शिवराय! जय संभाजी राजे!’
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अभिनेता संतोष जुवेकरने ही पोस्ट त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यासोबत त्याने आपल्या भूमिकेचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यांपैकी एकाने लिहिलंय, ‘उत्कृष्ठ अभिनय केला भाऊ. जगदंब….जगदंब….जगदंब’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘संत्या दादा… तू चित्रपटात आहेस हीच आम्हाला भाग्याची आणि गौरवाची गोष्ट आहे..’. तर अन्य एकाने म्हटले, ‘जास्त मराठी कलाकार पाहिजे होते मूवीमध्ये हे तुम्हाला बघून कळत..’.
छावाची छप्परतोड कमाई
‘छावा’ सिनेमाने रिलीजनंतर फक्त 3 दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, संतोषने या कमाईच्या आकड्यापेक्षा थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांचा आकडा महत्वाचा आहे असे म्हटल्याने त्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. छावा सिनेमाने विकेंडला तब्बल 72.4 कोटींची कमाई केल्याचे संतोषने या पोस्टमध्ये सांगितले आहे. येत्या दिवसात कमाईचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच या वर्षात ‘छावा’ हा सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा ठरणार हे स्पष्ट दिसून येतंय.
हेही पहा –