संतोष पवार… लेखक ते अभिनेता व्हाया दिग्दर्शक

मला पुन्हा महाभारत दाखवून महाभारत घडवायचं नाहीय. कारण त्यावर ऑलरेडी महाभारत घडलंय

एक हरहुन्नरी नाट्यकर्मी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अशा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता संतोष पवार याचं ‘यदा कदाचित रिटर्न्स’ रंगमंचावर परतलंय. पंचवीस वर्षांपूर्वी संतोषनं लेखक-दिग्दर्शकाच्या दुहेरी भूमिकेतून लोकनाट्याचा फॉर्म वापरून ‘यदा कदाचित’ हे नाटक रंगमंचावर साकारलं होतं. या नाटकाने रसिकांची मनं जिंकून अक्षरशः धुमाकूळ घातला. तब्बल साडेचार हजार प्रयोगांचा पल्ला गाठला होता. आता पुन्हा अवतरलेल्या ‘यदा कदाचित रिटर्न्स’ची पाळंमुळं याच ‘यदा कदाचित’मध्ये दडलेली आहेत.


पूर्वीच्या ‘यदा कदाचित’मध्ये लेखक-दिग्दर्शकाच्या भूमिकेमध्ये असलेला संतोष पवार आता ‘यदा कदाचित रिटर्न्स’मध्ये अभिनेता म्हणून वेगवेगळी आठ पात्रं साकारणार आहे. आठवणींना उजाळा देत संतोष सांगत होता की, ध्यानीमनी नसताना पंचवीस वर्षांपूर्वी ‘यदा कदाचित’ आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला मैलाचा दगड ठरला होता. आम्ही सगळेच नवीन होतो, चाचपडत होतो, रंगभूमीवर काहीतरी करण्यासाठी संधी शोधत होतो. मायबाप रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली. आमच्यातल्या बऱ्याच जणांची घरंदारं झाली. आम्ही सगळेच स्थिरस्थावर झालो. नाटकाची जी गुणवत्ता होती, तीच रसिकांनी माऊथ पब्लिसिटी द्वारे एकमेकांपर्यंत पोहोचवली होती. त्या नाटकाने आम्हा सर्वांना बरंच काही दिलं. कोकणातला जो नमन नाट्याचा फॉर्म आहे, त्यातली गंमत खुणावत होती मला… ती वापरूनच मी ‘यदा कदाचीत’ केलं होतं. त्यातले कॅरेक्टर खूप फनी होते. परंतु त्याचा आशय गंभीर होता. सत्तेचा विजय शेवटी का होतो? हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न त्यातून मांडला होता. हा खऱ्या-खोट्याचा झगडा जर आपण केला आणि तोही आपल्या फॉर्ममध्ये, आपल्या कोकणातल्या बोली भाषेमध्ये जर केला… तीच गाणी, तशाच मुव्हमेंट, तसाच आकृतीबंध वापरून, तर काय होईल?… हा विचार मी केला आणि ‘यदा कदाचित रिटर्न्स’ ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. कर्मधर्मसंयोगाने माझा कॉलेजचा मित्र किरण केळकर याची पत्नी मानसी केळकर ही निर्माती म्हणून या नाटकाला लाभली आहे. सोबतच आमचे गजाभाऊ वजराटकर आणि ऋतुजावहिनी यांची साथ लाभली. जेव्हा आम्ही तालीम करतो तेव्हा असं वाटतं की, या योग्य माणसांच्या हातात आमचं नाटक पडलेलं आहे.

संतोष पवार म्हटलं की, लोकनाट्य हे आलंच… यामागील प्रेरणास्रोताचा वेध घेताना कळलं की, संतोष लहानपणी सुट्ट्यांमध्ये गावी जायचा. त्यावेळी तमाशा पाहण्याच्या निमित्ताने अनेक लोककलाकारांच्या कला विविध गावांत जाऊन पाहण्याचा योग यायचा. त्याने त्यावेळीच याची ताकद ओळखली होती. तमाशाला आलेली मंडळी रात्रभर पाहत बसायची. त्यातला दिंडीचा प्रयोग त्याला खूप आवडला होता. गावामध्ये नदीकिनारी, झाडाखाली होणार्‍या त्याच्या तालमी त्याला आवडायच्या. एकदा तर दिंडीत काम करणार्‍या त्याच्या काकांनी त्याला दिंडीत काम करायलाच उतरवलं. दिंडीत जे काही करायचं – बोलायचं ते उत्स्फूर्त असतं. संतोषला ते चांगलंच जमलं आणि लोकनाट्याचं बीज त्याच्यात त्या क्षणाला खर्‍या अर्थाने पडलं. पुढे महाराष्ट्राची लोकधारा करताना, संतोषची गणगौळण पाहून चक्क शाहीर साबळेंची कौतुकाची थाप त्याच्या पाठीवर पडली. त्या दिवशी त्याला आकाश ठेंगणं झालं होतं.

कॉलेज स्पर्धांसाठी एकांकीका करताना संतोषच्या डोक्यातला लोकनाट्याचा किडा उफाळून आला आणि कौरव-पांडवांची पात्र रचना करून धमाल विडंबनात्मक एकांकिका तयार झाली. त्याला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. त्याचंच पुढे नाटक झालं, ज्यानं ‘यदा कदाचित’ नावानं धुमाकूळ घातला.

पूर्वीच्या ‘यदा कदाचित’ने भाऊ कदम, सागर कारंडे, संजय खापरे, भूषण कडू अशी त्यावेळची नवोदित पिढी रंगभूमीवर आणली. आज हे सारे नामांकित आहेत. आता ‘यदा कदाचित रिटर्न्स’ निमित्त संतोष पवार पुन्हा एकदा नवोदित कलाकारांची फळी सादर करत आहे. संतोषच्या म्हणण्यानुसार सगळेच कधी न कधी नवखे असतात, तसेच हेही कलाकार आहेत. पण माझा माझ्या लेखन-दिग्दर्शनावर विश्वास आहे. याचा अर्थ असा नाही की, हा ओव्हर कॉन्फिडंस आहे. मी प्रत्येक शब्दन् शब्दांची तालीम करून घेतो आणि प्रचंड घाबरून प्रयोग करतो. कारण हे प्रेक्षकांना आवडेल का?… हे आवडेलच असं गृहित धरून मुळीच करत नाही. मी प्रचंड साशंक असतो आणि जोपर्यंत मी समाधानी होत नाही, तोपर्यंत मी पुढे जात नाही. पूर्वीही ‘यदा कदाचित’च्या तालमी चालायच्या तेव्हा बाहेरची लोकं मजेत म्हणायची की, आत संतोष पवारची व्यायामशाळा चालू आहे!

‘यदा कदाचित’ने ज्याप्रमाणे रसिकांना खळखळून हसवलं त्याप्रमाणेच कौरव-पांडवांची पात्र घेऊन जे विडंबन नाट्य केलं, त्यावर काही कट्टरतावाद्यांना अंगावरही घेतलं. वाद झाले, कोर्ट-कचेर्‍या झाल्या. हे पाहता कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला. त्याबद्दल संतोष सांगतो की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवं. पण ते सहजासहजी मिळत नसतं. तुम्हाला झगडावं लागतं, संघर्ष करावाच लागतो. जे विरोध करत आहेत, त्यांचा विरोध पचवावाच लागेल. त्या विरोधाला उत्तर द्यावंच लागेल. त्याशिवाय त्या स्वातंत्र्याचं महत्व आपल्याला कळणारही नाही. मी हा विरोध खूप सहन केला, त्यातून खूप शिकलोही. आपल्या आणि समोरच्याच्याही अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आब राखून समोरच्याला कसं सांगता येईल, त्याला जे बोलायचंय, ते टोकदार असलं तरी, त्याला खुदकन हसायलाही लावलं पाहिजे. हे माझंही स्कील असेल.

आता रंगभूमीवर अवतरलेलं ‘यदा कदाचित रिटर्न्स’ विडंबनात्मक लोकनाट्याच्या फॉर्ममध्येच आहे. त्यात पुन्हा महाभारतच रंगणार का?… यावर संतोष मजेनं म्हणतो की, मला पुन्हा महाभारत दाखवून महाभारत घडवायचं नाहीय. कारण त्यावर ऑलरेडी महाभारत घडलंय. त्यामुळे यावेळी बाहुबलीच्या पार्श्वभूमीवर बल्लाळदेव, कट्टप्पा, देवसेना, शिवगामिनी यांच्या जोडीला अकबर-बिरबलाचं धमाल मिश्रण असणार आहे अन् त्यावरही कुरघोडी म्हणून शाहिस्तेखान, इम्रान खान, रामशास्त्री प्रभुणे असा लज्जतदार विनोदी तडका असणार आहे. खास बाब म्हणजे, संतोष स्वतः यात वेगवेगळी सात पात्र साकारणार आहे. संतोष यावर सांगतो की, यदा कदाचितमध्ये हे काही पहिल्यांदाच घडत नाहीय. पूर्वीच्या यदा कदाचितमध्ये प्रेक्षकांना माहीत नाही, पण मी काम करतच होतो. त्यावेळच्या कलाकारांच्या संचात ज्या प्रयोगाला एखाद्या कलाकाराला काही प्रॉब्लेम आला, तो प्रयोग करू शकला नाही की, मी ती जागा भरून काढायचो. मी जवळजवळ त्यातलं प्रत्येक कॅरेक्टर ऐनवेळी साकारलंय. पडद्याआड राहून वेळेला इतरांच्या भूमिका निभावणं ही चांगलीच भावना आहे. परंतु असं करताना पाठी राहून आपल्यातल्या अभिनेत्यावर अन्याय केला आहे, असं संतोषला कुठंतरी वाटू लागलं. कारण ‘नाय नो नेव्हर’मधून संतोषने स्वतःमधील अभिनेत्याला सिद्ध केलं आहे. कुठलाही रसिक हे नाकारणार नाही.