आठवणीत राहील असा ‘कॅलेंडर’ आणि ‘पेजर’ !

सतीश कौशिक यांचा जन्म हरियाणाच्या महेंद्रगड मधील धनोंदा गावामध्ये 13 एप्रिल 1956 ला झाला होता. कुटुंब कामधंद्यानिमित्त दिल्लीत स्थिरावल्यामुळे सतीशजींचं बालपण आणि शिक्षण दिल्लीमध्येच पूर्ण झालं. दिल्लीतील किरोरीमल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या सतीशजींना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याचा शौक होता. असं म्हटलं जातं की, ते त्यावेळी मेहमूदने पडद्यावर साकारलेले सीन्स घरी एकांतात करण्याचा प्रयत्न करत. हे अभिनयाचं भूत त्यांच्यात असं काही शिरलं होतं की, त्यांनी अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि विनोदी अभिनयच करायचा, हे ही पक्क होतं.

संतोष खामगांवकर

 

जर तुम्ही सिनेमाप्रेमी असाल तर सतीश कौशिक या व्यक्तिमत्वाबाबत अनभिज्ञ असूच शकत नाही. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, निर्मिती या चित्रपटसृष्टीतील विविध पैलूंना सतीश कौशिक यांचा स्पर्श झालेला आहे. विनोदी अभिनयाने त्यांनी मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही ठसा उमटवला. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या विविध विनोदी व्यक्तिरेखा, त्यांच्या नावानिशी प्रेक्षकांच्या लक्षात राहणाऱ्या ठरल्या, मग तो ‘कॅलेंडर’ असो अथवा ‘पप्पू पेजर’ !

सतीश कौशिक यांचा जन्म हरियाणाच्या महेंद्रगड मधील धनोंदा गावामध्ये 13 एप्रिल 1956 ला झाला होता. कुटुंब कामधंद्यानिमित्त दिल्लीत स्थिरावल्यामुळे सतीशजींचं बालपण आणि शिक्षण दिल्लीमध्येच पूर्ण झालं. दिल्लीतील किरोरीमल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या सतीशजींना लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याचा शौक होता. असं म्हटलं जातं की, ते त्यावेळी मेहमूदने पडद्यावर साकारलेले सीन्स घरी एकांतात करण्याचा प्रयत्न करत. हे अभिनयाचं भूत त्यांच्यात असं काही शिरलं होतं की, त्यांनी अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि विनोदी अभिनयच करायचा, हे ही पक्क होतं. घरच्यांचा विरोध होऊनही सतीशजी बदले नाहीत आणि अखेर सतीश कौशिक यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रशिक्षणानंतर सतीश कौशिक काही काळ दिल्लीत थिएटर करत होते. कालांतराने त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. इतर अनेक कलाकारांप्रमाणे त्यांनाही संघर्ष चुकला नाही. उराशी सिनेमाचं स्वप्न असलं तरी उदरनिर्वाहासाठी त्यांनी मुंबईतील एका मिलमध्ये कॅशियरची नोकरी केली. एकीकडे नोकरी सांभाळत सतीशजी दुसरीकडे वेळात वेळ काढून थिएटरही करत होते.

… आणि तो दिवसही आला जेंव्हा १९८३ ला ‘मासूम’ या चित्रपटामध्ये त्यांची वर्णी लागली. लगोलग त्यांना शाम बेनेगलांच्या ‘मंडी’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. १९८७ पर्यंत सतीश कौशिक यांनी जवळजवळ दहा चित्रपटांमध्ये भूमिका विविध निभावल्या होत्या. १९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या शेखर कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘कॅलेंडर’ या व्यक्तिरेखेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या विनोदी व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी नुसती दाद दिली नाही तर रातोरात सतीश कौशिक हिंदी सिनेमासृष्टीमध्ये कॉमेडियन म्हणून प्रस्थापित झाले. १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम लखन’ या चित्रपटातील ‘काशीराम’ ही व्यक्तिरेखाही तेवढीच गाजली. एकापेक्षा एक विनोदी व्यक्तिरेखा सतीश कौशिक यांच्या पदरात पडू लागल्या. त्यांचे गोविंदासोबतचे कॉमिक टाइमिंग ‘साजन चले ससुराल’ मध्ये प्रेक्षकांना दिसलेच शिवाय त्यांनी साकारलेला ‘मुथुस्वामी’ खळखळून हसवणारा ठरला. त्यांचा ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’ या चित्रपटातील अक्षय कुमारचा मामाजी हिट झाला. ‘बडे मिया छोटे मिया’ मधील शराफत अलीसुद्धा शानदार होता.

सतीश कौशिक यांना एकीकडे अभिनयाची जरी आवड असली तरी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या दिवसांत, विविध नाटकांचे दिग्दर्शन करणारा त्यांच्यातला दिग्दर्शकही स्वस्थ बसू देत नव्हता.त्यांनी ‘मासूम’ च्या वेळीही अभिनयासोबतच शेखर कपूरांच्या सहाय्यक दिग्दर्शकाचेही काम केले होते. बोनी कपूर यांनी त्यांना ‘रूप की रानी और चोरो का राजा’ या चित्रपटासाठी सर्वात प्रथम दिग्दर्शन करण्याची संधी दिली. ‘राजा’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही बोनी कपूर यांनी त्यां त्यांच्याकडे सोपवले होते. दुर्दैवाने हे दोन्ही चित्रपट दणदणीत आपटले. यासोबतच त्यांनी दिग्दर्शित केलेले आणखी काही चित्रपटही काही खास चालले नाहीत. असं म्हटलं जातं की, या अपयशाचा सतीशजींवर एवढा गहिरा दुष्परिणाम झाला की, अगदी आत्महत्या करण्याचे विचारही त्यांच्या मनात डोकावून गेले. परंतू स्वयंप्रेरणेनेच ते पुन्हा एकदा या अपयशाच्या भोवऱ्यातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. २००१ साल उजाडालं आणि त्यांनी तुषार कपूर आणि करीना कपूर यांना घेऊन दिग्दर्शित केलेला ‘मुझे कुछ कहना है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अशातच त्यांनी सलमान खानच्या डळमळणाऱ्या करिअरला पुन्हा एकदा वाटेवर आणणारा ‘तेरे नाम’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. एक चांगला दिग्दर्शक म्हणून ते शिक्कामोर्तब झाले.

सतीश कौशिक यांनी मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही स्वतःची कमाल दाखवलेली आहे. सोनी टीव्हीवरील ‘द ग्रेट इंडियन फॅमिली ड्रामा’ या कॉमेडी शो मधील त्यांनी साकारलेला ‘नवाब जंग बहादुर’ घराघरात पोहोचला. त्यानंतर स्टार प्लस वरील ‘सुमित संभाल लेगा’ मधील जसबीर वालिया, लाईफ ओकेवरील ‘ मे आय कम इन मॅडम’ मधील ‘गोबी-चाचा’ या त्यांच्या विविध भूमिकांनी छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची मन जिंकली होती. त्यांच्यातील अभिनेता आणि दिग्दर्शकासोबतच निर्मात्याचीही छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळाली. ‘डरना जरुरी है’ आणि ‘क्यूं कि…’ या चित्रपटांची निर्मिती सतीश कौशिक यांनीच केली होती.

सतीश कौशिक यांनी जसे चढ-उतार त्यांच्या व्यावसायिक जीवनामध्ये पाहिले तसेच वैयक्तिक जीवनातही काही धक्के त्यांनी पचवले. १९८५ साली त्यांचा विवाह झाला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शशि कौशिक यांना एक मुलगा होता. दुर्दैवानं काही गंभीर आजारामुळे 1996 साली त्यांचा मुलगा शानू याचे अकाली निधन झाले. सतीश कौशिक यांचं म्हणणं होतं की, जेव्हा त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं करिअर अशा टप्प्यावर होतं, जिथे त्यांना मुलाच्या मृत्यूचं दुःखही व्यक्त करायला वेळ मिळाला नव्हता. पुढे एकांतात विचार करत असताना त्या घटनेचा त्यांना खूप त्रास व्हायचा. या दुःखद घटनेनंतर त्यांची पत्नी बराच काळ डिप्रेशन मध्ये होती. परिणामी बरीच वर्षे त्यांना मूल झालं नाही. परंतु पुढे मेडिकल सायन्सच्या मदतीने त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले.

स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील दुःख चेहऱ्यावर येऊ न देता, कधी पप्पू पेजर बनून, तर कधी कॅलेंडर बनून जगाला हसवणारा हा सितारा आज निखळला आहे. सतीश कौशिक यांनी विविध भूमिकांतून भारतीय चित्रपटसृष्टीला तब्बल ४० वर्षांहून अधिक काळाचे योगदान दिले आहे. त्यांनी आजपर्यंत केलेल्या निखळ मनोरंजनाची दखल भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात निश्चितच घेतली जाईल.