अभिनेते सयाजी शिंदे यांनी मराठी, बॉलीवूड तसेच टॉलीवूड सिनेविश्वात आपल्या अभिनयाचा एक विशेष ठसा उमटवला आहे. एखादी भूमिका प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहचवण्याचे काम ते अगदी उत्तमरित्या करतात. यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करतात आणि म्हणूनच एक नव्हे तर विविध सिनेइंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाणं अगदी खणखणीत वाजत आहे. सयाजी शिंदेंना कायम वेगवेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. अशातच आता तब्बल 22 वर्षांनी सयाजी शिंदे रंगभूमी गाजवण्यास सज्ज झाले आहेत. यानिमित्ताने प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही.
22 वर्षांनी पुन्हा गाजवणार रंगभूमी :
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आजवर विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे साहजिक त्यांचा प्रेक्षकवर्ग फार मोठा आहे. गेली बरीच वर्ष सिनेविश्वात कार्यरत असलेले सयाजी शिंदे आता 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करताना दिसणार आहेत. मराठी रंगभूमीवर कायमच वैविध्यपूर्ण नाटकांची रेलचेल असते. त्यातच आता अभिनेते सयाजी शिंदे आणि अभिनेता, दिग्दर्शक, नाट्यनिर्माता अजित भुरे एकत्र येऊन रसिक प्रेक्षकांसाठी एक बहारदार कलाकृती घेऊन येत आहेत.
कलासंपन्न कलाकारांची जोडगोळी :
सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून हे नवे नाट्यपुष्प येत आहे. या नव्या नाटकासाठी अभिनेते सयाजी शिंदे आणि अभिनेते तसेच नाट्यनिर्माते अजित भुरे असे दोन दिग्गज मान्यवर एकत्र येत आहेत. आता उत्सुकता अशी की, एवढ्या प्रतिभासंपन्न कलाकारांसोबत ही नाट्यसंस्था कोणते नाटक घेऊन येतेय? या नाटकात अजून कोणकोणते कलाकार असणार? या नाटकाचा शुभारंभ कधी? प्रश्न अनेक असले तरीही उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. तूर्तास आनंदाची बाब अशी की, अभिनेते सयाजी शिंदे 22 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. तर नाट्यनिर्माते अजित भुरे यांची पावले 6 वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळली आहेत.
नव्या नाटकाबाबत सयाजी शिंदे म्हणाले…
आगामी नाटकाविषयी बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, ‘सगळ्यात आधी मी नाटकात काम करण्याच्या हेतूनेच मुंबईत आलेलो. पण पुढे चित्रपटांत व्यस्त झालो. यानंतर आता पुन्हा रंगभूमीवर काम करता येणार आहे याचा मला प्रचंड आनंद आहे. प्रत्येक 5 वर्षांनी माणूस आणि गोष्टी बदलतात. हा बदल आता नव्या नाट्यकृतींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. ते म्हणतात ना जुनं ते सोनं.. तसंच जुन्या विषयाचा नव्या बाजूने आढावा घेण्याचं काम करायचा मानस असतेवेळी मला या नाट्यकृतीची विचारणा झाली. त्यात अजित भुरे यांसारख्या कलासक्त माणसासोबत मी प्रायोगिक काम केलं. आता या नाटकाच्या निमित्ताने व्यावसायिक काम करताना त्याच्याकडून आणखी काहीतरी शिकायला मिळणार, हे महत्वाचं. अजित म्हणायचा, कलाकारापेक्षा माणूस महत्त्वाचा आणि मी मनोरंजनाचा समृद्ध काळ पाहिला आहे. त्यामुळे या समृद्धतेचा अनुभव आम्ही मिळून नाट्यरसिकांना येणार आहोत’.
दिग्दर्शक, नाट्यनिर्माते अजित भुरे म्हणाले…
मी सयाजी शिंदेंना झुलवा या नाटकात पाहिलं होतं आणि तो अविस्मरणीय अनुभव होता. अशा कमालीच्या कलाकारासोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मला प्राप्त झाल्याचा मला आनंद आहे. मला खात्री आहे की, यामुळे मी सुद्धा एक कलाकार म्हणून समृद्ध होईन. मराठी नाट्यसृष्टीत माइलस्टोन ठरलेल्या कलाकृतीला आत्ताच्या काळात भिडणे आव्हानात्मक आहे. पण सुमुख चित्र संस्थेच्या पुढाकाराने हा योग्य जुळून आला आहे आणि मी याचा भाग असल्याचा मला आनंद आहे.
हेही वाचा : Republic Day Fashion Tips : प्रजासत्ताक दिनी कॉटन साड्यांनी मिळवा क्लासी लूक
Edited By – Tanvi Gundaye