-हर्षदा वेदपाठक
सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांची आज सकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्षाचे होते. मागील तीन वर्ष त्या अल्झायमर या आजाराने पीडित होत्या. घरातच त्यांचे कुटुंबीय यांची काळजी घेत होते. आज सकाळी झोपेतच त्यांना देवाज्ञा झाल्याची माहिती त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी महानगर बरोबर बोलताना दिली.
सीमा देव यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची विशेष जोडी जमली ती रमेश देव यांच्याबरोबर. पुढे पद्यावरची पसंद केली जाणारी जोडी, वास्तविक संसारात देखील घर करून बसली. या देव जोडीला एकत्र पाहणे म्हणजे चित्रपट प्रेमींना एक पर्वणीच असायची यावर कोणाचे दुमत होणार नाही.
सीमाताईंनी नखरेल भूमिका केल्या आणि खलनायिका. पण प्रत्यक्षात मात्र त्या अत्यंत सोज्वळ व लाघवी होत्या. आदर्श गृहिणीची भुमिका त्या मनापासून करणाऱ्या. त्यांच्या शांत समंजसपणाने त्यांनी घर आणि माणसं बांधून ठेवली होतीत. घर व करियर यांत तारेवरची कसरत करणाऱ्या आजच्या तरुणींचा त्या आदर्श ठरू शकतील. सहसा मुलं झाल्यावर, अभिनेत्रींचं करिअर संपतं, तसं त्यांचे झालं नाही. सिनेमा, नाटक, अभिनय लेखन, निर्मिती या सगळ्या अंगाने त्या सतत कार्यरत राहिल्या. सीमाताई गुणगुणतही गोड. त्यांना उत्तम स्मरणशक्ती लाभली होती. अश्या या व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या या गुणी अभिनेत्रीला अल्झायमरसारखा आजार व्हावा, हे दुर्दैवी.
त्यांना लोकांचे आदरतिथ्य करायला फार आवडतं असे. त्या सुगरण होत्या, ते फार कमी लोकांना ठावूक असेल. त्यांच्या सुना कर्तबगार आहेत, याचं त्यांना कोण कौतुक. त्यांचा स्वभाव वाद घालण्याचा नव्हता. जिथे संधर्षाचे प्रसंग येऊ शकतील, तिथे सगळ्यांची मनं वळवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. प्रत्यक्ष आयुष्यात खूप कष्ट करून त्या ज्या स्थानावर पोचल्या होत्या, त्या प्रवासात माणसांचं महत्त्व त्यांनी जाणलं व मानलं होतं. म्हणूनच माणसं न दुखावण्याची त्या काळजी घेत असत.
सात्विक सौंदर्य, उपजत अभिनयगुणांच्या बळावर सीमा देव यांनी पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटरसिकांना भुरळ घातली. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, अपराध सारख्या मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी आनंद, संसार, कोशिश, मर्द या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी स्वतःच्या अभिनयाचा प्रभाव दाखवला होता. सीमा देव यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
मुंबईतील गिरगावमधल्या चाळीत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सीमा देव या पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ. लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. घरात आर्थिक हातभार लागावा, म्हणून त्या काही स्टेज शोजमध्ये नृत्य करीत. वयाच्या नवव्या वर्षी एका बॅलेमध्ये नृत्य करत असताना त्यांची प्रतिभा इब्राहिम नाडियादवाला यांनी हेरली. नंतर अभिनेत्री म्हणून नावारुपाला आलेल्या आशा पारेखसुद्धा याच कार्यक्रमात नृत्य करत होत्या. नाडियादवाला यांनी दोघींना चित्रपटात काम करण्यासाठी विचारणा केली. आणि ‘अयोध्यापती’ या हिंदी चित्रपटातून दोघींनी बाल कलाकार म्हणून पदार्पण केलं. त्यांना खरी ओळख मिळाली ते दिग्गज निर्माता, दिग्दर्शक राजा परांजपे यांच्या चित्रपटांमधून. राजा परांजपे यांनी त्यांच्यातली अभिनेत्री घडवली. जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला सारख्या चित्रपटांमधून त्यांना चित्रपट रसिकांची दाद मिळाली.
चित्रपट कलावंतांचे विवाह जास्त टिकत नाहीत, असा सर्वसामान्यांमध्ये समज असतो. रमेश – सीमा देव हे दाम्पत्य मात्र त्यास अपवाद ठरले. 1963 साली झालेला त्यांचा हा विवाह, रमेश देव यांच्या जाण्यापर्यंत टिकला.
सीमा देव यांचं ‘सुवासिनी’ हे आत्मचरित्रही काही वर्षापूर्वी प्रकाशित झालं होतं. त्यामध्ये, सीमाताई यांनी, त्यांचे बालपण, चित्रपटसृष्टीतील प्रवेश, रमेश देव यांच्या बरोबरची भेट, लग्न, ठराविक दिग्दर्शक, चित्रपट, काही कलाकार यासह कुटुंब यावर लेखन केले होते.
रमेश देव यांना जाऊन जेथे दीड वर्ष देखील झाले नाही. तेथे सीमा देव यांच्या जाण्याने देव कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. सीमा देव यांच्या मागे अभिनव आणि अजिंक्य ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
सीमा देव यांच्यावर आज दादर येथील, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कर करण्यात आले. सुलोचना दीदी नंतर, आज आणखीन एक सोज्वळ चेहरा काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने, मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.