भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता. यात शिरीषकुमार या १५ वर्षीय बालक्रांतिकारकाने स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. महाराष्ट्रातील नंदूरबारचे ते सुपूत्र होते. ९ सप्टेंबर हा शिरीषकुमार यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचे योगदान पुढील पिढ्यापर्यंत पोहचविण्यासाठी ‘शहीद शिरीषकुमार’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. भावेश प्रोडक्शन्सतर्फे हा चित्रपट तयार केला जात असून त्याचे दिग्दर्शन भावेश पाटील करीत आहेत.
‘शहीद शिरीषकुमार’ चित्रपटाचे चित्रीकरण खानदेशात केले जाणार आहे. अतिशय भव्यरित्या या चित्रपटाची निर्मीती केली जाणार असून अनेक मोठे कलाकार या चित्रपटाचा भाग असणार आहेत. शिरीषकुमार यांनी अवघ्या १५व्या वर्षी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव आजच्या पिढीला व्हावी यासाठी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याचे दिग्दर्शक भावेश पाटील यांनी स्पष्ट केले.
९ सप्टेंबर १९४२ रोजी महात्मा गांधींसह प्रमुख नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केल्याला एक महिना पूर्ण झाला होता, या आंदोलनात ब्रिटिश राजवटीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण दिवस संप करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले होते. शिरीषकुमार आणि त्यांच्या साथीदारांच्या आवाहनाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. लहानग्या शिरीषने केलेल्या आव्हानाने संतप्त झालेल्या पोलिसांनी शिरीषकुमारांवर गोळीबार केला. त्यात त्यांना वीरमरण आले. या देशभक्ताच्या समर्पणाची आठवण म्हणून ‘शहीद शिरीषकुमार’ हा चित्रपट लवकरच रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होणार आहे.