Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनShashank Ketkar : शशांक केतकरला सलतेय ती गोष्ट, म्हणाला - इतकं काम करूनही

Shashank Ketkar : शशांक केतकरला सलतेय ती गोष्ट, म्हणाला – इतकं काम करूनही

Subscribe

मराठी नाटक, मालिका, चित्रपट ते हिंदी वेबसिरीजपर्यंत मजल मारलेला अभिनेता शशांक केतकर त्याच्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. विषय सामाजिक असो, राजकीय असो वा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित असो तो कधीही व्यक्त होताना घाबरला नाही. सध्या शशांकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांची झलक दाखवली आहे. त्याच्या या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण असे असतानाही अभिनेत्याच्या मनाला एक गोष्ट सलतेय. ज्याविषयी त्याने बोलून दाखवलंय. (Shashank Ketkar a famous marathi actor expressed regret)

विविधांगी भूमिका साकारणारा नायक

अभिनेता शशांक केतकरने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत साकारलेला श्री आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘सोपं नसतं काही’, ‘शो टाइम’, ‘गुनाह’ अशा अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका तसेच वेब सीरिजमध्ये शशांकने कमालीच्या भूमिका साकारल्या.

सध्या स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ मालिकेत तो अक्षय मुकादम ही भूमिका साकारतोय. त्याच्या या भूमिकेवरदेखील प्रेक्षक प्रेम करताना दिसत आहेत. दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडीओत शशांकच्या याच मालिका- सिरीजमधील विविध भूमिकांची झलक दाखवली आहे. हा व्हिडीओ त्याच्या एका चाहत्याने बनवला आहे. जो शशांकने स्वतःच्या हॅण्डलवर शेअर केला आहे.

शशांकने व्यक्त केली खंत

अभिनेता शशांक केतकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. याच माध्यमातून तो व्यक्त होताना दिसतो. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ त्याने आपल्या हँडलवर शेअर केला आहे. सोबत, ‘गेल्या 14 वर्षांत मी बरंच काम केलं. इतकं करूनही शेवटी लोक ”तू टीव्हीचा अॅक्टर” अगदी सहज म्हणून जातात. आजवर मी विविध माध्यमांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या’.

‘कधी सकारात्मक, कधी नकारात्मक, कधी संवेदनशील तर कधी धाडसीसुद्धा. प्रत्येक भूमिकेचा आत्मा समजून घेतला आणि मग त्यात जीव ओतण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी मी काम करत असतो तेव्हा कोणतंही माध्यम लहान किंवा मोठं नसतं. प्रत्येक व्यक्तिरेखा माझ्यासाठी एक नवी जबाबदारी आणि संधी असते. जिच्या माध्यमातून मी स्वतःला पुन्हा नव्यानं शोधतो आणि घडवतो’, असं शशांक म्हणाला.

हेही पहा –

Loveyapa Movie Review : हलक्या फुलक्या कॉमेडीतून Gen Z साठी लव डोस