मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता शशांक केतकर. मालिका तसेच चित्रपटांच्या माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाची प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारा शशांक कायमच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची आनंददायी बातमी चाहत्यांना दिली होती. यानंतर आता शशांकने त्याच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाल्याची आनंदवार्ता दिली आहे. अर्थात शशांकला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
केतकरांच्या घरी लक्ष्मीचे आगमन
अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला मुलगी झाल्याची गोड बातमी दिली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याच्या हातात पत्नीचे हात आणि दोघांच्या हातात चिमुकल्या लेकीचे हात दिसत आहेत. शिवाय लेकीला पाळण्यात घालून कौतुकाने तिच्याकडे पाहतानाचा फोटो आणि व्हिडीओशेवटी तिचे नावदेखील दाखवले आहे. शशांक आणि प्रियंकाने त्यांच्या लेकीचे नाव ‘राधा…’ असे ठेवले आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाविश्वातून बऱ्याच कलाकारांनीदेखील शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
हम दो हमारे दो
अभिनेता शशांक केतकरने ४ डिसेंबर २०१७ रोजी त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेसोबत लग्न केले. २०२१ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचे नाव ऋग्वेद असे आहे. यानंतर आता केतकर दांपत्याने दुसऱ्या अपत्याचे स्वागत केले आहे. जी कन्या असून तिचे नाव राधा असे ठेवण्यात आले आहे. शशांकचे त्रिकोणी कुटुंब आता चौकोनी झाले आहे. यानिमित्त त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्टसोबतच इंस्टाग्राम हॅण्डलवर एक स्टोरीदेखील अपडेट केली आहे. ज्यात शशांकच्या मागे भिंतीवर एक सुंदर कौटुंबिक चित्र रेखाटलेले दिसत आहे. ज्यावर ‘हम दो हमारे दो’ आणि प्रियांका, ऋग्वेद, राधा, शशांक असे लिहिलेले दिसत आहे.
अभिनेता शशांक केतकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याने आतापर्यंत मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरिज अशा चारही माध्यमांत काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक जागा तयार केली आहे. सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय मुकादम या मध्यवर्ती भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री शिवानी मुंढेकरदेखील या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय.
हेही वाचा : Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे करणार तब्बल 22 वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन
Edited By – Tanvi Gundaye