HomeमनोरंजनShivali Parab : शिवाली हे खरंय? असा सुरु झाला कल्याणच्या चुलबुलीचा हास्यजत्रेतला...

Shivali Parab : शिवाली हे खरंय? असा सुरु झाला कल्याणच्या चुलबुलीचा हास्यजत्रेतला प्रवास

Subscribe

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्यातला एक बूस्टर डोस आहे. यात दाखवली जाणारी प्रहसने आणि कलाकारांकडून साधलं जाणारं विनोदाचं अचूक टायमिंग आपसूकच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणतं. याच कार्यक्रमातून कमी वयात ‘कॉमेडी क्वीन’ हा किताब मिळवणारी शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीस आली. तिचा हास्यजत्रेतला प्रवास कसा सुरु झाला? याविषयी जाणून घेऊया.

शिवाली दीपक परब. 12 मे 1995 रोजी कल्याणच्या एका सर्व सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. शिवालीचे वडील रिक्षाचालक तर आई शिवणकाम करणारी गृहिणी. घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यात पाठीमागे एक लहान बहीण असल्यामुळे नोकरीसाठी आवश्यक इतके शिक्षण तिने घेतले. मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याने छोटीमोठी नोकरी करावी असा तिचा मानस होता. तिने बऱ्याच ठिकाणी मुलाखतीसुद्धा दिल्या. दरम्यान, अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करत असताना आपला अभिनयाकडे कल असल्याचे तिला समजले.

अभिनयाची आवड जोपासायची म्हणून तिने जोगेश्वरीतील एक नाटकाचा ग्रुप जॉईन केला. या ग्रुपच्या माध्यमातून तिने आगरी महोत्सवाला हजेरी लावली. जिथे अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता अरुण कदम शो होस्ट करत होते. यावेळी ज्याला आगरी भाषा येत असेल त्याला काम करण्याची संधी होती आणि इथे शिवालीला आपली कला सादर करण्यासाठी एक चांगला स्टेज मिळाला. शिवालीचे सादरीकरण पाहून नम्रताने तिचे कौतुक केले आणि हास्यजत्रेच्या टीमला तिचं नाव सुचवलं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ब्रेक मिळाल्यानंतर शिवालीने या संधीचं अगदी सोनं करून दाखवलं. हळूहळू तिचा चुणचुणीतपणा प्रेक्षकांना आवडू लागला. शिवालीने प्रहसनात साकारलेल्या भूमिकांना कमी काळात विशेष प्रेम मिळू लागले. कमी वयात शिवालीने मोठी मजल मारली आणि सामान्य कुटुंबाची लेक महाराष्ट्रभर ‘कॉमेडी क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘शिवाली हे खरंय?’, ‘अवली लवली कोहली’ या प्रहसनांमध्ये शिवालीने साकारलेल्या भूमिका म्हणजे अगदी मॅडनेसचा कहर आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला ‘गोल्डन वूमन आयकॉन अवॉर्ड्स 2023’मध्ये ‘बेस्ट पॉप्युलर एंटरटेनर ऑफ दि इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. तसेच 2022 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटासाठी तिला ‘सांस्कृतिक कला दर्पण महोत्सव 2023’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही पहा –

Saif Ali Khan : हल्ल्यानंतर मुलांच्या सुरक्षेबाबत सैफ- करीनाचा मोठा निर्णय