Shivani Sonar And Ambar Ganpule wedding : अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. या दोघांच्या लग्नाची चाहत्यांसह मराठी सेलिब्रिटी आतुरतेने वाट पाहत होते. आता या जोडप्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. ग्रहमख, हळद, मेहंदी, संगीत सोहळा असे लग्नाआधीचे सर्व विधी त्यांचे थाटामाटात पार पडले.
शिवानी व अंबर यांनी लग्नात पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्रीने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी, लाल रंगाचा शेला, हिरवा चुडा, दागिने असा लूक केला होता. तर, अंबरच्या मराठमोळ्या लूकने सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोघांच्या लग्नातील अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिवानी आणि अंबर यांचा साखरपुडा गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पार पडला होता. यानंतर शिवानी आणि अंबरसाठी ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने केळवण आयोजित केलं होतं. त्यानंतर ग्रहमख विधी पार पडला ते झाल्यावर या दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. मेहंदी सोहळ्यात या दोघांनी Twinning केल्याचं पाहायला मिळालं होते. अंबर आणि शिवानी या दोघांनी मेहंदी सोहळ्यातील सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाआधीचे सगळे विधी पार पडल्यावर आता ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे.
दरम्यान, शिवानी आणि अंबर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेमुळे शिवानीला घराघरांत लोकप्रियता मिळाली. यानंतर सुबोध भावेबरोबर ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली होती. तर अंबरने आतापर्यंत ‘रंग माझा वेगळा’ ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.