कुंभमेळ्यातच श्रवण राठोड यांना कोरोनाने गाठलं होतं, मुलाचा खुलासा

कुंभमेळ्याहून परत आल्यावर श्रवण यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.

shravan rathod visited kumbh mela and then tested positive for covid-19
कुंभमेळ्यातच श्रवण राठोड यांना कोरोनाने गाठलं होतं

हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचे गुरुवारी वयाच्या ६६ व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. श्रवण यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना माहीमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, श्रवण हे कुंभमेळ्यात सहभागी झाले होते आणि तेथून परतल्यावर त्यांना कोरोनाची बाधा झाली होती, अशी माहिती त्यांचा मुलगा संजीव राठोड याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात देशभरातून लाखो भाविक सहभागी झाले होते आणि यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाली होती.

आमच्या कुटुंबाला इतक्या कठीण काळातून जावे लागेल याचा आम्ही विचारही केला नव्हता. माझ्या वडिलांचे निधन झाले, मला आणि माझ्या आईला कोरोनाची बाधा झाली. माझ्या भावालाही कोरोनाची बाधा झाली असून तो होम क्वारंटाईन आहे. मात्र, आमच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्याला अंत्यविधी करण्याची परवानगी आहे, असे श्रवण राठोड यांचा मुलगा संजीवने सांगितले.

कुंभमेळ्याहून परत आल्यावर श्रवण यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर कोरोनाची चाचणी झाल्यावर श्रवण यांचा आणि त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मागील सोमवारी त्यांना रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे म्हटले होते. त्यांनी काल (गुरुवारी) अखेरचा श्वास घेतला.


हेही वाचा – लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन