श्रेया घोषाल हे भारतीय संगीतविश्वातील मोठे नाव आहे. आपल्या कर्णमधुर आवाजाने तिने कायम लाखो रसिकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिने गायनाला सुरुवात केली आणि आज जगभरात तिच्या आवाजाचे चाहते आहेत. शास्त्रीय संगीत, प्रेमगीत, भावगीत अशा विविध जॉनरसाठी तिने गाणी गायली आहेत. केवळ सिनेमांसाठी नव्हे तर जाहिराती, वेब सिरीज आणि संगीत अल्बम्ससाठी देखील तिने गायन केले आहे. आज श्रेया घोषालचा 41वा वाढदिवस आहे. यानिमित्त आपण तिच्या करिअर आणि इनकमविषयी जाणून घेणार आहोत. (Shreya Ghoshal Birthday learn about her Net Worth)
श्रेया घोषालच्या आवाजाचे चाहते केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत. त्यामुळे देशाबाहेरदेखील तिच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठी गर्दी दिसते. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्व देशांमध्ये तिच्या शोची तिकिटं अगदी तासाभरात हाऊसफुल्ल होतात. हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये तिने गायन केले आहे. फार कमी लोक जाणतात की, श्रेया घोषाल ही एका गाण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणारी भारतीय गायिका आहे.
एका गाण्यासाठी घेते ‘इतके’ मानधन
गायिका श्रेया घोषाल ही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पार्श्वगायिकांपैकी एक आहे. जी एका गाण्यासाठी सुमारे २५ ते ३० लाख रुपये इतके मानधन घेते. इतकेच नव्हे तर, तिच्या लाइव्ह कॉन्सर्टसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची लोकांची तयारी असते. एकूणच श्रेयाची लोकप्रियता पाहता आणि सरासरी कमाई विचारात घेता आजच्या घडीला ती २०० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
भारतीय संगीत विश्वातील अनमोल रत्न
गायिका श्रेया घोषालला संगीत क्षेत्रातील योगदानासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात ‘देवदास’, ‘परीणिता’, ‘जोगवा’ आणि ‘अंतरमहल’ या सिनेमांतील गाण्यांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत तिला 7 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तर मराठीत ‘जोगवा’ आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटांसाठी तिने विशेष गौरव मिळवला आहे. माहितीनुसार, 2012 मध्ये श्रेयाला फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 लिस्टमध्ये स्थान मिळाले होते. ब्रिटनची राणी एलिझाबेथसुद्धा तिच्या सुरेल आवाजाची चाहती आहे. IIFA, स्क्रीन अवॉर्ड्स, मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स आणि झी सिने अवॉर्ड्स यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी श्रेया घोषाल खऱ्या अर्थाने भारतीय संगीत विश्वातील एक अनमोल रत्न आहे.
हेही पहा –
Gulkand Movie : प्रेमाचा गोडवा वाढणार, गुलकंदमधील पहिलं गाणं रिलीज