मराठी तसेच बॉलिवूड सिनेविश्वात प्रसिद्ध असणारा अभिनेता श्रेयस तळपदे आणि बॉलिवूड सिनेअभिनेते आलोकनाथ मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्यांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण इंदूरमधील नोंदणीकृत सोसायटीतील 50 लाखांहून जास्त लोकांची कोट्यवधी रुपयांना फसवणूक केलेल्या कंपनीच्या प्रमोशनसबंधित आहे. याप्रकरणी हरियाणातील सोनीपत येथे अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्याविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सिनेविश्वातील बरेच कलाकार वेगवेगळ्या कंपनी, प्रोडक्ट्ससाठी प्रमोशनल जाहिराती करत असतात. अशाच एका जाहिरातीमुळे अभिनेता श्रेयस तळपदे आणि बॉलिवूड अभिनेते आलोकनाथ यांना कायदेशीर अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. इंदूरमधील एका कंपनीने 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळ काढला. या कंपनीमध्ये अनेकांनी जवळपास 6 वर्ष गुंतवणूक केली होती. अशा कंपनीसाठी या दोन्ही कलाकारांनी गुंतवणुकीसंदर्भात जाहिरात केल्याप्रकरणी ही FIR नोंद केली आहे. या कंपनीच्या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेता सोनू सूददेखील प्रमुख पाहून म्हणून उपस्थित राहिला होता.
FIR मध्ये काय लिहिलंय?
पोलिसांकडे दाखल झालेल्या FIR नुसार तक्रारकर्त्यांनी म्हटलंय, ‘या कंपनीने गेल्या 6 वर्षांपासून कित्येक लोकांकडून पैसे घेतले आहेत. त्यावेळी या कंपनीने फिक्स्ड डिपॉझिट (FD) किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना भविष्यात मोठा परतावा देऊ, असे आश्वासन दिले होते. इतकंच नव्हे तर, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित केले गेले. त्यांनी प्रोत्साहनाच्या नावावर बहुस्तरीय मार्केटिंगसाठी कित्येक एजंट मार्केटमध्ये उतरवले होते’.
‘सुरुवातीला या कंपनीकडून काही लोकांना पैसे मिळाले. पण कोट्यवधी जमा झाल्यावर कंपनीकडून पैसे टाळाटाळ सुरु झाली. गुंतवणूकदारांना अंदाज येताच त्यांनी आपले पैसे परत मागितले. अशावेळी कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करून बसले होते. 2023 मध्ये मात्र कंपनीचा खरा चेहरा समोर आला. मोठमोठे दावे, भाकड आमिषे दाखवून त्यांनी मूळ हेतू लपवला होता. पण जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सोसायटीच्या सदस्यांवर फसवणुकीचा आरोप केला. त्यावेळी सोसायटीच्या मालकांनी एजंट व गुंतवणूकदारांना टोलवून पुढे त्यांच्याशी संबंध तोडले. जेव्हा लोक कार्यालयात जाऊन गोंधळ घालू लागले, तेव्हा तिथेही कुलूप लावलं. एव्हाना सर्व अधिकारी आणि कर्मचारी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले होते’.
श्रेयस तळपदे, आलोकनाथ यांच्यासह आणखी 11 जणांची नावे
एकूणच मोठमोठी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून या कंपनीने लोकांच्या पैशावर सपशेल डल्ला मारला आणि पळ काढला. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही लोकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली. त्यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे, आलोकनाथ यांच्यासह आणखी 11 जणांची नावे आहेत. या मार्केटिंग कंपनीचे प्रमोशन केल्याप्रकरणी FIR दाखल झाल्याने दोन्ही अभिनेत्यांना पुढे कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागणार आहे. पंजाब आणि हरियाणा कोर्टात ही याचिका दाखल झाली असून उद्या (25 जानेवारी) याबाबत सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या हस्ते स ला ते स ला ना ते चित्रपटाचा ट्रेलर लाँच
Edited By – Tanvi Gundaye