Sidhu Moose wala Murder: हत्येसाठी राजस्थानहून मागवली होती गाडी, तपासातून आले समोर

सिद्धूच्या हत्येसाठी राजस्थानहून गाडी मागवण्यात आली होती. हनुमानगढमार्गे ही गाडी पंजाबमध्ये आली होती. दरम्यान, या हत्येप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याची हत्या झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हायप्रोफाईल केस (Highprofile case) असल्यामुळे पोलीसही या प्रकरणी कसून तपास करत आहेत. नियमित तपासातून रोज रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. आज आलेल्या माहितीनुसार, सिद्धूच्या हत्येसाठी राजस्थानहून गाडी मागवण्यात आली होती. हनुमानगढमार्गे ही गाडी पंजाबमध्ये (Punjab) आली होती. दरम्यान, या हत्येप्रकरणी अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. हरियाणातील फतेहबाद आणि पंजाबमधील सरदूलगढच्या दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) हे आरोपी दिसत आहेत. त्यांनी बोलेरोमध्ये पेट्रोल भरलं. पोलिसांना खात्री आहे की ही तीच बोलेरो आहे ज्याच्या वापर सिद्धूच्या हत्येसाठी करण्यात आला.

पंजाब पोलिसांनी (Punjab Police) हरियाणातील फतेहबाद येथे मध्यरात्री दोन आरोपींना अटक केली. याआधी पोलिसांनी राजस्थानमधील सरदारशहर आणि सीकर येथे छापेमारी केली.

सिद्धूच्या हत्येनंतर आरोपींनी एक ऑल्टो कारही (Alto Car) चोरली होती. पण ही कार त्यांनी मध्येच रस्त्यात सोडून पलायन केले. त्यामुळे पोलिसांनी ही कारही ताब्यात घेतली आहे.

याआधी पोलिसांनी मनप्रीत सिंह मन्नू (Manpreet Singh Mannu), मनप्रीत उर्फ सुखपाल (Sukhpal) आणि शरद (Sharad) यांना ताब्यात घेतलं होतं. या तिघांनीही लॉरेन्स बिश्नोईच्या (Laurance Bishnoi) गँगमधील शार्प शूटर असल्याचं मान्य केलं. दरम्यान, सिद्धूच्या हत्येवेळी मनप्रीत आणि शरद हे दोघेही गोल्डी ब्रार याच्याशी व्हर्च्युअल क्रमांकाच्या माध्यमातून संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर सिद्धू मूसेवाला याची हत्या तिहार जेलमध्ये रचली गेल्याचंही समोर आलं आहे.