शब्दसुरांच्या किमयेने मराठी ‘बाहुबली’चे सौंदर्य वाढले – बेला शेंडे

मराठी बाहुबलीत दोन गाणी बेलाच्या आवाजात स्वरबद्ध

singer bela shende record two songs in marathi dubbed bahubali movie
शब्दसुरांच्या किमयेने मराठी ‘बाहुबली’चे सौंदर्य वाढले – बेला शेंडे

गायिका बेला शेंडे यांनी आपल्या मधाळ आवाजाने रसिक प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. आता ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आणलेल्या बाहुबली चित्रपटाच्या मराठी अवतारातही बेलाच्या आवाजाची जादुगिरी रसिकांना अनुभवायला मिळाली. यातील दोन गाणी बेलाच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. त्यानिमित्ताने बेला ने ‘मराठी बाहुबली’ चित्रपटाच्या गीत संगीताची निर्मीती व त्याच्या सादरीकरणाचा अनुभव सांगितला आहे.

चित्रपटातील गीतसंगीत हा देखील चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग असतो. एखादया हिट चित्रपटातील तितकीच हिट असलेली गाणी ‘रिक्रिएट’ करणं तितकं सोपं नसतं. प्रेक्षकांच्या मनात आधीच्या गाण्याची चाल पक्की असते अशावेळी वेगळ्या भाषेत ते गाणं आणत त्याचा परिणाम जराही कमी होऊ न देण्याची जबाबदारी मोठी असते. ही जबाबदारी मराठी बाहुबलीचे गीतकार वैभव जोशी, मिलिंद जोशी व संगीतकार कौशल इनामदार यांनी लीलया पेलली त्यामुळेच गायकांना गाणं स्वरांच्या माध्यमातून आणणं सहज शक्य झाल्याचं बेला सांगते. या मातब्बरांसोबत काम करणं हा कायमच आनंददायी अनुभव असल्याचं ती सांगते.

‘मराठी बाहुबली’ या चित्रपटाने मराठी भाषेचे शब्दवैभव व त्याची किमया प्रेक्षकांना दाखवून दिली. भाषेच्या रंजकतेमुळे मराठी बाहुबलीने प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक नामवंत कलाकारांच्या साथीने ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने बाहुबलीचे ‘मराठीकरण’ करताना त्याच्या सगळया बाजूंकड़े कटाक्षाने लक्ष दिलं. भाषा-संवाद, गीतसंगीत, पार्श्वसंगीत या सर्व बाबतीत भव्यता जपली, त्याचीच परिणीती म्हणजे ‘मराठी बाहुबली’ला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

भारतीय सिनेजगतात लोकप्रियतेचा उच्चांक तयार करणाऱ्या बाहुबलीचा हा मराठमोळा साज पुन्हा पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. येत्या रविवारी २८ नोव्हेंबरला सकाळी ९.०० वाजता ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’ वर ‘मराठी बाहुबली’ पुन:प्रक्षेपित होणार आहे.


हेही वाचा – Rakhi Sawant Birthday: कधी बॉयफ्रेंडला थप्पड तर कधी रचलं स्वयंवर, जाणून घ्या राखीच्या अफेयर्सची कहाणी