‘सन मराठी’ वरील ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता आशिष पवार करत आहे. रोजच्या धावपळीतून महिलांना थोडा विसावा मिळावा या उद्देशाने ‘सन मराठी’ने हा कार्यक्रम सुरु केला आहे. ‘सोहळा सख्यांचा’ या कार्य्रक्रमानिमित्ताने महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणणं, त्यांच्या मनात लपलेलं दुःख समजून घेणं, माहेरच्या आठवणींना उजाळा देणं या सर्व गोष्टी शेअर करत मनोरंजन करणारे खेळ महिलांना खिळवून ठेवतात. ‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण झाले. या निमित्ताने सूत्रसंचालक आशिष पवारने या प्रवासाबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमामुळे पहिल्यांदा मी सूत्रसंचालन केलं आहे. जेव्हा पहिला भाग शूट झाला त्यावेळी प्रचंड दडपण आलं होत. आता 100 भाग पूर्ण झाले आहेत, याचा आनंद तर आहेच पण आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त महिलांच्या चेहऱ्यावरील हसण्यामागचं कारण मी आहे म्हणून अभिमानही वाटत आहे. ‘सन मराठी’ने माझ्यावर विश्वास ठेवून मला खूप मोठी संधी दिली आणि त्या संधीचं मी सोनं करत आहे. या कार्यक्रमाचे निर्माते, दिग्दर्शक विनय नलावडे यांचाही खूप पाठिंबा मिळत आहे. अभिनेता म्हणून बऱ्याचदा गंभीर भूमिका पण साकारल्या आहेत पण प्रेक्षकांनी विनोदी अभिनेता आशिष पवार म्हणून मला पसंती दिली. पण, या कार्यक्रमातून मला महिलांचं मनोरंजन करण्याबरोबरच त्यांच्या मनातील दुःख जाणून घेता येत आहे. यामुळे पुन्हा हेच कळत की, प्रेक्षकांना रडवणं सोपं आहे पण हसवणं तितकंच कठीण. पण या कार्यक्रमात महिलांना हसवता हसवता खूप वेळा रडलो आहे.”
यापुढे आशिष म्हणाला की,”माझ्या स्वभावात विनोदी गुण हा आईमुळे आला आहे. हा कार्यक्रम पाहताना आई नेहमी माझं कौतुक करत असताना एक सल्ला देते. महिलांना भरभरून हसवत जा रडवत जाऊ नको. खरंच 100 भागांच्या प्रवासात बऱ्याच महिलांच्या आयुष्यातील गंमतीशीर, गंभीर किस्से ऐकत असताना अंगावर काटा आला आहे. कार्यक्रमानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान मिळते. या कार्यक्रमाचे शूटिंग करण्यासाठी जवळपास 3-4 तास लागतात. पण तरीही महिला कंटाळत नाही, घरी जाताना स्वतःहून म्हणतात की, आज आम्ही आमच्यासाठी जगलो, तुमच्यामध्ये आम्हाला भाऊ दिसला. आणि हे कौतुक ऐकून पुढील भाग शूट करण्यासाठी ऊर्जा मिळते.
हेही पाहा –