ह्रदय संगिनी उपक्रमात सोनाली

Sonali kulkarni

सर्जनशील अभिनेत्री म्हणून मोठ्या सोनाली कुलकर्णीचे चित्रपटसृष्टीमध्ये नाव आहे. फक्त मराठीतच ती वलयांकीत नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा तिने स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग निर्माण केलेला आहे. निव्वळ मनोरंजन करणारे चित्रपट ती फारसे स्वीकारत नाही तर त्यात प्रबोधनही असायला हवे असा तीचा आग्रह असतो. प्रत्यक्ष जीवनातही ती या गोष्टीला महत्त्व देते. राष्ट्रसेवादल, अंधश्रद्धा निर्मूलन अशा कितीतरी संस्थेत ती सक्रिय आहे. आंदोलन, मोर्चे यात सहभागी होऊन होणार्‍या अन्यायाविरुद्ध ती उभी राहिलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी माधवबाग ही संस्था ह्रदयविकाराच्याबाबतीत असलेल्या समस्या सोडवण्याचा अनेक दशकांपासून प्रयत्न करत आहे. जागतिक ह्रदय परिषदेचा अहवाल लक्षात घेतला तर पुरुषांपेक्षा महिला ह्रदयविकाराने अधिक ग्रासल्याचे लक्षात आलेले आहे. ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांसंबंधी पुरेशी माहिती नसल्यामुळे हा रोग बळावतो. त्याविषयी जागृती व्हावी असे माधवबागच्या पदाधिकार्‍यांना वाटते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या उपक्रमात सहभागी होणार आहे.

मार्च 2019 ते मार्च 2020 या वर्षभरात राबविल्या जाणार्‍या या उपक्रमाला ह्रदय संगिनी हे नाव दिले गेलेले आहे. महिलांच्या वयाची 35 वर्षे उलटल्यानंतर खर्‍या अर्थाने त्यांच्या शारीरिक, मानसिक समस्यांना सुरुवात होते. रजोनिवृत्तीच्या काळात केवळ दुर्लक्ष केल्यामुळे आणि त्या गोष्टी जाणून न घेतल्यामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागते. ह्रदयरोग हा भारताचीच समस्या नाही तर गेल्या संपूर्ण शतकात जगातला हा नंबर एकचा जीवघेणा रोग ठरलेला आहे. मधुमेह, हायपर टेन्शन, धूम्रपान, तणाव, लठ्ठपणा याविषयीची वर्षभरात जागृती केली तर ह्रदयरोगाला काही प्रमाणात आळा बसेल असे आयोजकांचे म्हणणे आहे. सोनालीलासुद्धा ही गोष्ट महत्त्वाची वाटते आहे. महिलांमध्ये जनजागृती करण्याच्यादृष्टिने ती वर्षभर या उपक्रमाला वेळ देणार आहे. माधवबागचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहित माधव साने हे या बाबतीत अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत.