प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2025 मधील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 139 लोकांना सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान केला गेला. यात 7 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण आणि 113 पद्म श्री पुरस्कारांचा समावेश आहे. यावर प्रसिद्ध गायक सोनू निगमने संगीत विश्वातील अनेक दिग्गज व्यक्ती पद्म पुरस्कारांपासून वंचित असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्याने पद्म पुरस्कार घोषणेनंतर काही तासांतच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केली आहे. माहितीनुसार, बिहारची स्वर कोकिळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्म विभूषण आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगला पद्म श्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Sonu Nigam shared disheartened post Regarding Padma Awards 2025)
सोनू निगमची व्हिडीओ पोस्ट
प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘भारत आणि त्याचे प्रलंबित पद्म पुरस्कार विजेता!’ या व्हिडिओत त्याने म्हटलंय, ‘दोन असे गायक ज्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. त्यांच्यापैकी एक केवळ पद्म श्री पुरस्कारापर्यंतच सीमित राहिले – मोहम्मद रफी साहब आणि दुसरे ज्यांना पद्म श्री मिळाला नाही – किशोर कुमार जी’.
View this post on Instagram
पुढे म्हणाला, ‘आजकाल मरणोत्तर पुरस्कार दिले जात आहेत, मात्र जिवंत लोकांमध्येदेखील अलका याग्निक यांसारखे व्यक्तिमत्व आहे. ज्यांचा इतका मोठा आणि अभूतपूर्व कार्यकाळ राहिला आहे. तरीही त्यांना अद्याप असा सन्मान मिळालेला नाही. श्रेया घोषाल, जी एव्हढ्या मोठ्या काळापासून आपली कला सादर करते आहे तीचाही या सन्मानावर अधिकार आहे. सुनिधी चौहान, जिने आपल्या आवाजाने एक अख्खी पिढी प्रेरित केली आहे तिलाही अजून काहीच मिळालेलं नाही’.
कसा मिळतो हा पुरस्कार?
सर्वोच्च नागरिक सन्मान स्वरूपात ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या एकूण 3 श्रेणी आहेत – पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री. हे पद्म पुरस्कार ‘पद्म पुरस्कार समिती’च्या शिफारसींमधून प्रदान केले जातात. पद्म पुरस्कार समितीचे अध्यक्षपद कॅबिनेट सचिव भूषवतात आणि यामध्ये गृह सचिव, राष्ट्रपतींचे सचिव यांसह अन्य 4 ते 6 प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. समितीच्या शिफारशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातात. ज्यातून निवड होणाऱ्यांना हे मानाचे पुरस्कार प्रदान केले जातात.
सोनू निगमच्या करिअरविषयी..
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमविषयी सांगायचं झालं तर, संगीत कलाविश्वात त्याला ‘मॉडर्न रफी’ या नावाने ओळखले जाते. सोनू निगमला अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये 2022 च्या पद्म श्री पुरस्काराचा समावेश आहे. सोनू निगमने हिंदीसह कन्नड़, बंगाली, मराठी, तेलुगु, तमिल, उड़िया, इंग्रजी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाली, तुलु, मैथिली आणि मणिपुरी भाषेतही गायन केले आहे. माहितीनुसार, सोनू निगमने त्याच्या करिअरची सुरुवात 1992 मध्ये केली. टीवी मालिका ‘तलाश’साठी त्याने ‘हम तो छैला बन गए’ हे गाणे गायले होते. पुढे अनेक सिनेमांसाठी त्याने एकापेक्षा एक हिट ट्रॅक दिले.
हेही पहा –
Shah Rukh Khan : मी अजून 30 वर्षांचाचं, वयाबाबत बोलताना SRK कडून नव्या सिनेमाचे संकेत