Friday, March 21, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनSthal Movie Review : स्त्रीच्या स्वप्नांपेक्षा लग्नाला प्राधान्य देणाऱ्या मुर्दाड समाजाची गोष्ट - स्थळ

Sthal Movie Review : स्त्रीच्या स्वप्नांपेक्षा लग्नाला प्राधान्य देणाऱ्या मुर्दाड समाजाची गोष्ट – स्थळ

Subscribe

लग्नसंस्थेवर भाष्य करणारे अनेक सिनेमे तुम्ही पाहिले असतील. काळानुसार बदलणाऱ्या परिभाषा तुमच्या आमच्यासाठी नवीन नसल्या तरीही खरंच काळानुसार बदल होतोय का? हा एक प्रश्नच आहे. आजही ग्रामीण भागात बऱ्याच जुन्या परंपरांचे पालन केले जाते. आता याला श्रद्धा म्हणावं का आणखी काही.. आजही मुलीच्या घरी तिला पाहायला पाहुणे जाण्याची पद्धत आहे. हे पाहुणे चहा- पोहे फस्त करण्यासोबत मुलीला अनेक प्रश्न विचारतात. ज्याची उत्तरं तिने द्यायलाच हवीत असा अट्टाहास असतो. मग मुलगी पसंत पडली तर लग्न.. मग संसार आणि बरंच काही..

पण मुळात प्रश्न फक्त मुलीला का विचारतात? असा सवाल करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पूर्वीच्या काळातील मुली घरातली मोठी मंडळी सांगतील त्या मुलासोबत लग्न करायच्या. आपली स्वप्न, आशा, ईच्छा, अपेक्षा असं सगळं काही मागे सोडून संसाराला लागायच्या. पण आताच्या मुली शिक्षण आणि करिअरबाबत फार सजग असतात. आजच्या काळात लव्ह मॅरेज फार कॉमन गोष्ट झाली आहे. इतकंच काय तर वयाच्या तिशीपर्यंत मुली लग्नाच्या थांबतात. आपल्याला कसा जोडीदार हवा हे स्वतः ठरवतात. पण म्हणून अरेंज मॅरेज करताना मुलाऐवजी मुलगी मुलाला पाहायला जाईल आणि त्याची वर परीक्षा घेईल असे घडू शकते का? ही कल्पना सुखावणारी असली तरी शक्यता कमीच आहे.

एकूणच काय काळ पुढे गेला असला तरी विचारसरणी तीच आणि तशीच.. याला काही कुटुंब अपवाद असली तरी मूळ समाज आजही त्याच रूढी, परंपरांमध्ये अडकलेला आहे. स्पष्ट बोलायचं तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा भागातील मुली शिक्षण घेऊनही लग्नाची घाई करतात. ग्रामीण भागातील मुलींना एखाद्या मुलाशी बोलायचीसुद्धा परवानगी नसते. शिवाय 18 वर्ष पुर्ण झालेल्या मुलीचं कधी एकदा लग्न लावून टाकतो असं तिच्या आई वडिलांना वाटत असतं. सचिन पिळगांवकर प्रस्तुत ‘स्थळ’ हा चित्रपट अशाच मुली आणि पालकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट MPSC करू पाहणाऱ्या एका महत्वाकांक्षी मुलीची आणि तिला येणाऱ्या स्थळांची आहे. चला तर जाणून घेऊयात हा चित्रपट नेमका कसा आहे?

‘स्थळ’ या चित्रपटाचे कथानक कापसाची शेती करणाऱ्या एका शेतकरी कुटुंबाभोवती आणि त्यांच्या महत्वाकांक्षी लेकीभोवती फिरते. वयात आलेल्या सविताच्या लग्नासाठी तिच्या घरचे स्थळ पाहत असतात. पण सविताला इतक्या लवकर लग्न करायचं नसतं. तर तिला MPSC ची परीक्षा द्यायची असते. पण आई- वडिलांच्या इच्छेचा मान राखून ती लग्नासाठी ‘स्थळं’ पाहू लागते. कुणी रंगावरून तर कुणी उंचीवरून तिला नकार देऊन जातं. नकार पचवण्यापेक्षा आपल्या स्वप्नांची राख रांगोळी होताना पाहणं सविताला फार वेदनादायी ठरतं. दरम्यान, तिच्या एका मैत्रीणीचं लग्न अगदी थाटामाटात पार पडतं. जे पाहून तिच्या आई वडिलांना आपल्या मुलीचं लग्न होत नाही म्हणून बुजल्यासारखं वाटतं. अशावेळी हा चित्रपट समाजाचा लग्न न जमणाऱ्या मुलीकडे आणि तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती विचित्र असतो, यावर भाष्य करतो.

इतकेच नव्हे तर हा चित्रपट मुलीला पाहायला येणाऱ्या स्थळाची मानसिकता, त्यांचा मुलीच्या घरातील वावर आणि अपेक्षा यावर प्रकाश टाकतो. ग्रामीण भागातील लोकांचे दैनंदिन जीवन, त्यांची बोलीभाषा, शहराशी जोडलेले असूनही आधुनिकतेची कमी या चित्रपटात दाखवली आहे. गावातून शहरात शिक्षणासाठी जाणऱ्या मुलींचे शिक्षकांकडे होणारे आकर्षण आणि त्या त्या वयातील मुलींच्या भावनांचे यात उत्तम सादरीकरण केले आहे. चित्रपटातील काही प्रसंग तुमच्या मनात चीड तर काही प्रसंग तुम्हाला भावनिक करतील इतक्या क्षमतेचे आहेत. एकीकडे मुलीचं लग्न ठरवण्यासाठी शेतकरी वडिलांची धडपड, कापसाला योग्य भाव नसताना घेतलेला निर्णय आणि अखेर आत्महत्येसारखं पाऊल.. या सर्व गोष्टी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेतात.

एकूणच हा चित्रपट प्रगतीच्या वाटेवर असलेल्या समाजाची अधोगती दाखवतो. स्त्रीच्या स्वतंत्रतेवर, हक्कांवर बोट उचलणाऱ्या समाजाची मानसिकता दर्शवतो, स्त्रियांना अटीशर्थींमध्ये जखडु पाहणाऱ्या पुरुषांचा अहंकार दाखवतो आणि ग्रामीण भागातील स्त्री पुरुषांच्या वैचारिक तसेच आर्थिक वर्चस्वाखाली कशी दाबली जाते हे दाखवतो. हा चित्रपट स्त्री सशक्तीकरण होण्यासाठी खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र होणे गरजेचे आहे यावर स्पष्ट भाष्य करतो. गावातील मुलांची बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुंडा अशा समाजातील अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात एकही मोठा स्टार कलाकार नाही. पण या चित्रपटाची कथाच स्टारपेक्षा कमी नाही, हेही तितकंच खरं. असं असलं तरीही सामाजिक विषयांवर लक्ष केंद्रित करणारे चित्रपट पाहायला प्रेक्षकांची गर्दी होत नाही, हे दुर्दैव म्हणावं लागेल. पण हा चित्रपट खऱ्या अर्थाने आजची गरज आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

हेही पहा –

Sanjay Dutt : संजय दत्तच्या आयुष्यात या महिलांचा आहे महत्वाचा रोल