देशभक्तीची भावना लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी जाणल्यावरच जादू निर्माण होते – सुभाष घई

मुंबई : लेखकाला देशभक्तीच्या भावनेची जाणीव असावी लागते, दिग्दर्शकाने ते अनुभवायला हवे, कलाकारांना त्या भावना जाणवल्या पाहिजेत; तेव्हाच तुम्ही ती जादू निर्माण करू शकता, असे बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई म्हणाले. ‘हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए…’ या गाण्याबद्दल ते म्हणाले, ‘कर्मा’ चित्रपटात सहभागी असलेल्या प्रत्येकाला तशा भावना जाणवल्या होत्या आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही त्या भावना जाणवल्या, असे मला वाटते.

नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण समारंभाला सुभाष घई यांच्यासह चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिव्या दत्ता, निर्माता शब्बीर बॉक्सवाला आणि पटकथा लेखक संदीप श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फिल्म्स डिव्हिजनने स्वातंत्र्य लढ्यावरील 18 चित्रपट आणि महत्त्वाचे ऐतिहासिक क्षण यांचे संकलन केलेल्या विशेष डीव्हीडी संचाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

कर्मा, भाग मिल्खा भाग आणि शेरशाह या लोकप्रिय देशभक्तीपर चित्रपटांचे सर्वांसाठी मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भाकर म्हणाले, हे वर्ष भारतातील तसेच जगभरातल्या सर्व भारतीयांसाठी खास आहे, आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या वर्षी ‘हर घर तिरंगा मोहिमे’चा एक भाग म्हणून इतक्या लोकांना झेंडे फडकवताना पाहणे ही देखील अभिमानाची बाब आहे. आपणही आपली सर्वोत्तम कामगिरी करूया. भारताचा विकास आणि वैभव आणखी वाढवूया. सिनेमा हे खूप सशक्त माध्यम आहे आणि देशाला जागतिक नकाशावर आणण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

‘कर्मा’ चित्रपटात काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य मानतो. चित्रपटाशी निगडीत अनेक छान आठवणी आहेत. दिलीपजी अतिशय मृदू स्वभावाचे होते. त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी आम्हाला अक्षरशः त्यांच्याजवळ जावे लागायचे, असे अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.

भाग मिल्खा भागच्या माध्यमातून मला फाळणी आणि आज आपण साजरे करत असलेल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांना मोजावी लागलेली किंमत या संदर्भातील एक कथा सांगायची होती. ‘मेरी सारी नफरत पाकिस्तान के खिलाफ मिट गई,’ अशी प्रतिक्रिया मिल्खा सिंग यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली होती आणि याच भावनेसाठी हा चित्रपट बनवला होता, असे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांगितले.

चांगला सिनेमा जग बदलू शकतो यावर माझा कायम विश्वास आहे. जेव्हा शेरशाहची कथा माझ्याकडे आली, तेव्हा मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे मेजर विक्रम बत्रा यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी केलेली कामगिरी. या वयात आपल्यापैकी अनेकांना आयुष्यात काय करायचे आहे ते स्पष्ट माहीत सुद्धा नसते. त्यांच्या कथेने अनेकांना प्रेरणा दिली आहे, असे शब्बीर बॉक्सवाला म्हणाले.