सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना रुग्णालयात दाखल केले असल्याचे बातमी समोर आली आहे. मु्ंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना बुधवारी श्वसनाचा त्रास, अशक्तपणा आणि वारंवार चक्कर येत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. प्रसिद्ध दिग्दर्शकाची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येताच सोशल मिडियावर त्यांचे चाहते काळजी व्यक्त करत आहेत.
सुभाष घई हे सध्या 79 वर्षाचे आहेत. आतापर्यत त्याच्या तब्येतीबद्दल कुटूंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. पण, ताज्या अपडेटनुसार ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात गेले असल्याचे समजत आहे. रुग्णालयात सुभाष घई यांच्यावर न्युरोलॉजिस्ट डॉ. चौहान, हृदयरोगतज्ञ डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत.
सुभाष घई यांचे काम –
खरं तर, सुभाष घई यांना अभिनेता व्हायचे होते. पण, त्यांच्या नशिबाचे चाक असे फिरले की, अभिनेता होण्यासाठी बाहेर पडलेल्या सुभाष घई यांनी कितीतरी कलाकारांना सुपरस्टार बनवले. सुभाष घई यांनी आजपर्यत 16 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यातील 13 चित्रपट हे सुपरहीट ठरले आहेत. त्यांनी आपल्या चित्रपटांसह अनेक कलाकरांना स्टार बनवले आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, रीना रॉय, मीनाक्षी यांचा समावेश आहे. 2006 मध्ये इक्बाल या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सुभाष घई यांचे चित्रपट –
सुभाष घई यांनी कालीचरण, कर्ज, हिरो, विधाता, मेरी जंग, कर्म, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस, ताल अशा अनेक चित्रपटांची निर्मीती केली आहे. 2014 मध्ये त्यांनी शेवटचा कांची हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
Edited By – Chaitali Shinde