सुधा करमरकरांचा बजरबट्टू

Sudha Karmarkar

‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटकाच्या निमित्ताने थोडाफार बालप्रेक्षक वर्ग रंगभूमीच्या दिशेने फिरकला असला तरी एकंदरीत बालरंगभूमीची स्थिती लक्षात घेता चिंता व्यक्त करावी असे वातावरण आहे. साधारण वीस वर्षांपूर्वी बालरंगभूमीला समाधान व्यक्त करावे असा बहर आला होता. यात खर्‍या अर्थाने बालरंगभूमीला संजिवनी दिली ती दिवंगत सुधा करमरकर यांनी. त्यांचे घर मुळात कलावंतांचे होते. वडील नाटकाशी संबंधित असल्यामुळे करमरकरही त्यानिमित्ताने रंगमंचावर दाखल झाल्या होत्या. त्यावेळी बालनाटक होत होती; पण छोट्यांनी मोठ्यांचे कपडे परिधान करून ती हौस भागवली जात होती. याच दरम्यान त्यांना अमेरिकेत जाता आले. तिथली बालरंगभूमी पाहून त्या चकीत झाल्या. त्या संदर्भाचा त्यांनी अभ्यास केला. भारतात परतल्या त्यावेळी त्यांनी एकच ध्यास घेतला, तो म्हणजे बालरंगभूमी समृद्ध करण्याचा. लहान मुलांचे स्वत:चे असे विश्व असते. चेटकीण, राक्षस, भूत यांना घाबरणारा बालप्रेक्षक परी, टारझन, बोलणारे पक्षी, प्राणी यांच्यातही गुंतून राहू शकतो. या सार्या गोष्टी बालनाटकात यायला पाहिजेत हे त्यांनी ठरवले आणि त्यातूनच स्वत:ची ‘लिटल थिएटर’ जी बालरंगभूमी म्हणून ओळखली जाते , त्याची स्थापना त्यांनी केली.

गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. वय झाल्यानंतरसुद्धा त्यांनी बालरंगभूमीसाठी काम करणे चालू ठेवले होते. जवळजवळ अडतीस नाटके त्यांनी बालरंगभूमीवर आणली होती. लेखन, दिग्दर्शनाबरोबर अभिनय असा त्यांचा बालरंगभूमीसाठी प्रवास होता. याचा अर्थ प्रौढांच्या नाटकासाठी काम केले नाही असे नाही. पण ध्यास मात्र बालरंगभूमीचाच घेतला होता आणि त्यामुळेच पुढे बालरंगभूमीचे जे सातत्य राहिले त्यात त्यांच्या शिष्यांचा, सहकार्यांचा मोठा वाटा होता. सुधा करमरकर यांनी त्यावेळी जी काही बालनाटके सादर केली त्यात ‘बजरबट्टू’ हे एक होते. करमरकर यांच्या प्रथम स्मृतीदिनाचे निमित्त घेऊन हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणण्याची तयारी केलेली आहे. त्यासाठी डॉ. मिलिंद करमरकर यांच्या सोबत नातेसंबंधित असलेले विजय केंकरे, मंगल केंकरे यांनीसुद्धा नाटकाचा शुभारंभ होण्याच्यादृष्टीने सहकार्य केलेले आहे. करमरकरांनी संकल्पना मांडायची आणि ती रंगमंचावर अविष्कारीत करायची, प्रत्येक नाटक बालप्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मदतनीसांची फौज होती त्यात लीला विनोद हडप यासुद्धा होत्या. ‘बजरबट्टू’ च्या निमित्ताने करमरकरांच्या स्मृतीला उजाळा मिळेल.