घरमनोरंजन‘सुपर’ : वैचित्र्यपूर्ण निराशावादी विनोद

‘सुपर’ : वैचित्र्यपूर्ण निराशावादी विनोद

Subscribe

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच निराशावाद हा एक घरगुती शब्द बनलेला आहे. मिलेनियल म्हणून ओळखली जाणारी एक संपूर्ण पिढी याच ‘निहिलिसजम’च्या ‘जीवन व्यर्थ आहे’ अशा अर्थाच्या व्याख्येकडे जगण्याचा दृष्टिकोन म्हणून पाहते. याच निराशावादाचे आणखी विस्तारित स्वरूप किंबहुना त्याला जोड म्हणून ब्लॅक कॉमेडीचा वापर करणारे बरेचसे चित्रपट दोन हजारोत्तर दशकांत दिसून येतात. आय डोन्ट फील अ‍ॅट होम इन धिस वर्ल्ड एनीमोअर, मी अँड अर्ल अँड द डाईंग गर्ल किंवा अगदी थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबिंग मिस्सौरीदेखील या प्रकारच्या विनोदाकडे वळताना दिसतो.

जेम्स गन या लेखक दिग्दर्शकाचे सिनेमॅटिक विश्व अगदी ब्लॅक कॉमेडीपुरते मर्यादित न राहता अ‍ॅब्सर्डिझमकडे वळणारे आहे. ज्याला ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’ चित्रपट मालिकेने अधिक स्थैर्य बहाल केलेले असले तरी अगदी त्याही चित्रपटांत वैचित्र्यपूर्ण, वेडसर प्रकारच्या विनोदाचे अस्तित्त्व आहे. अर्थात त्या विनोदाचे स्वरूप अधिक मेनस्ट्रीम बनण्याच्या बंधनामुळे काहीसे खालावलेले आहेच. त्यामुळे गनची ‘गार्डियन्स’ पूर्व फिल्मोग्राफी अधिक वैचित्र्यपूर्ण, वेगवेगळ्या जॉन्रमध्ये झोके घेणारी आहे. मुख्य म्हणजे तिचे कुठल्याच पातळीवर न स्थिरावणे तिला अधिक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनवते.

‘सुपर’ हादेखील त्याच्या वैचित्र्यपूर्ण अशा फिल्मोग्राफीत शोभणारा चित्रपट आहे. ज्याची संकल्पना खरं तर फार मूलभूत स्वरूपाची आहे. फ्रँक (रेन विल्सन) हा एका हॉटेलमधील कुक आहे. तो त्याच्या वेंधळ्या, निरागस (फक्त पूर्वार्धात) स्वभावामुळे कुणालाही आवडून जावा असा, आयुष्यात अपयशी असणारा ‘बॉय (किंवा मॅन) नेक्स्ट डोअर’ संकल्पनेचं मूर्त स्वरूप आहे.

- Advertisement -

अर्थात एवढं सगळं असून तो आनंदी आहे. कारण ‘लव्ह ऑफ माय लाईफ’ संज्ञेवर खरी उतरणारी सुंदर बायको, सॅरा (लिव्ह टायलर) एरवी अपमानकारक असणार्‍या त्याच्या आयुष्यात त्याच्यासाठी आनंदाचा स्रोत आहे. मात्र सॅरा ड्रग्जच्या आहारी जाऊन, जॅकच्या (केविन बेकन) प्रेमात (?) पडून फ्रँकला सोडून निघून जाते आणि त्याच्या आयुष्याची उलथापालथ व्हायला सुरुवात होते. तिच्या निघून जाण्याने आपल्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे निरनिराळे मार्ग शोधत असणार्‍या फ्रँकला एका ख्रिश्चन केबल चॅनलवरील हास्यास्पद प्रसंग पाहून, तसेच देव स्वतः आपल्याला लोकांची मदत करण्यास सांगत आहे अशा अर्थाच्या स्वप्नांपासून प्रेरणा मिळते. आणि तो लिबी (एलन पेज) या कॉमिक बुक स्टोअरमधील क्लार्कच्या सहाय्याने स्वतःच (सुपर) हिरो बनतो. परिणामी त्याच्या आयुष्यात अनपेक्षित घटनांची रांग लागते.

तर आधी उल्लेख केल्याप्रमाणे काही कारणाने व्हिजलांटे बनत, लोकांची मदत करणं (आणि तशा अर्थाचं मध्यवर्ती पात्र असणं) ही संकल्पना बरीच सामान्य आहे. मात्र ‘सुपर’चं विविध पातळींवर वर्क होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याची हाताळणी, दृश्यांची मांडणी आणि केवळ सुपरहिरो चित्रपटांवरील स्फुट बनण्यापर्यंत मर्यादित न राहता ती सीमा ओलांडून, स्वतंत्र चित्रपट म्हणून आपलं स्वतःचं असं विश्व तयार करणं. हे विश्व खरंखुरं आहे. वास्तविक आहे. उद्भवणार्‍या समस्यांना व्यावहारिक पद्धतीने सामोरे जाणारे आहे. याउलट आपला नायक आहे. जो वेंधळा, अव्यावहारिक आहे. मात्र तो मनाने सच्चा आहे आणि त्याचे नायकत्व मान्य करण्यासाठी तूर्तास तितके कारण पुरेसे आहे.

- Advertisement -

मात्र खरी समस्या (आणि मजा) या दोन विरोधाभासी गोष्टींच्या एकत्र येण्यामुळे सुरु होते. कारण आपली बायको आपल्याला सोडून गेली हे मान्य न करणारा फ्रँक जेव्हा त्याला व्यावहारिक दृष्टिकोनातून समजावू पाहणार्‍या पोलीस अधिकार्‍यासमोर येतो किंवा हाच फ्रँक जेव्हा सुपरहिरो (?) सूट अंगावर चढवून हास्यास्पदरित्या ‘शट अप क्राईम!’ असं म्हणू लागतो तेव्हा ही दोन्ही जग एकमेकांची खिल्ली उडवताना, विडंबनाचं रूप धारण करताना दिसतात.

ज्यामुळे आपण लोकांना मदत करू शकू म्हणून गुन्हा घडण्याची वाट पाहत कचर्‍याच्या डब्ब्यांमागे लुप्त, ‘क्रिम्सन बोल्ट्स जर्नल; नाईट वन’ असं म्हणणारा हा सुपरहिरो (आणि त्याचं विश्व) ‘वॉचमेन’ (2009) सारख्या सुपरहिरो चित्रपटांची आणि त्यांच्या विडंबनावर उपहास म्हणून काम करतो. तर त्याने केलेली हिंसा स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही ‘गुन्हेगारांचा खून करणं यात कसला आलाय गुन्हा’ असं म्हणत पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध बोलणारी सामान्य जनता ही आपल्या हिंसा एन्जॉय करण्याच्या वास्तविकतेवर उपरोध म्हणून काम करते.

त्यातील बहुतांशी लोकांना त्रासदायक वाटू शकणार्‍या, अतिरिक्त हिंसात्मक दृश्यांमुळे ‘सुपर’ सहजासहजी पाहता येणं शक्य नसलं तरी ही हिंसा ब्लॅक कॉमेडी आणि उपरोधिक स्वरूपाची अधिक असल्याने चित्रपटाच्या भाष्याच्या हिशोबाने तिच्या केलेल्या वापराकरिता पहावी अशी आहे. ‘सुपर’ ही एक कॉम्प्लेक्स फिल्म आहे. जी पूर्ण पाहून झाल्यावर तिच्या उणीवा आणि मजबूत अंगं या दोन्हींमुळे संमिश्र भावना निर्माण करते. मुख्य म्हणजे या भावना आपल्या वास्तविकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍या असल्याने त्या टाळणे अशक्य होऊन बसते. परिणामी ही फिल्मही पाहायची टाळू नये अशी बनते हे वेगळे सांगणे न लगे.

– अक्षय शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -