घरताज्या घडामोडीSushantsingh Rajput Case - महेश भट्ट यांची दोन तास पोलिसांकडून चौकशी

Sushantsingh Rajput Case – महेश भट्ट यांची दोन तास पोलिसांकडून चौकशी

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट यांची सोमवारी वांद्रे पोलिसांकडून तब्बल दोन तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांची जवाब नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही, मात्र सुशांत, त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्यासह इतर विषयांवर ही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

१४ जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केल्यानंतर त्याचा तपास वांद्रे पोलिसांनी सुरु केला होता. याच प्रकरणात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर सिनेअभिनेत्री कंगणा राणौतने बॉलीवूडमधील गटबाजीसह घराणेशाहीबाबत गंभीर आरोप केले होते. या गटबाजी आणि घराणेशाहीतून सुशांतने आत्महत्या केल्याचा आरोप करुन तिचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओची गृहमंत्र्यांनी गंभीर दखल घेत त्याची शहानिशा करण्याचे आदेश वांद्रे पोलिसांना दिले होते. त्यामुळे कंगणाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आरोप केलेल्या सर्वांची चौकशी सध्या सुरु आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वांद्रे पोलिसांनी महेश भट्ट, निर्माता-दिग्दर्शक करण जौहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले होते.

समन्स मिळताच महेश भट्ट यांनी सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याची संमती दर्शविली होती, त्यामुळे त्यांना सांताक्रूज पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता महेश भट्ट हे सांताक्रुज पोलीस ठाण्यात हजर झाले होते, त्यानंतर त्यांची दोन तास चौकशी करण्यात आली. यावेळी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्यासह इतर दोन पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होते. सुशांत आणि रिया यांच्या रिलेशनशसह इतर विषयांवर त्यांची चौकशी करण्यात आली होती. महेश भट्ट यांच्या सडक दोन या चित्रपटासाठी सुरुवातीला सुशांत आणि रिया यांना घेण्यात आले होते, मात्र ऐनवेळेस सुशांतला काढून दुसर्‍या अभिनेत्याला घेण्यात आले, रियासाठी त्याने प्रयत्न केले, मात्र रियाच्या जागी महेश भट्ट यांनी त्यांची मुलगी आलिया भट्ट हिची निवड केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या चौकशीचा तपशील उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. लवकरच करण जौहरसह त्याच्या मॅनेजरची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यानंतर इतरांची एक यादी पोलिसांनी काढली असून त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले जातील असे पोलिसांनी सांगितले. सुशांतच्या आत्महत्येचा तपास अंतिम टप्यात असून लवकरच त्याचा एक अहवाल पोलीस आयुक्तांसह गृहमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –संतापजनक! वडिलांना आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारून केली हत्या!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -