प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभ मेळा सध्या भारतासह जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरतोय. या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत अनेक नामांकित मंडळींनी हजेरी लावली. जगभरातील भक्तांसोबत राजकीय नेतेमंडळी आणि अगदी सिनेविश्वातील कलाकारांनीसुद्धा या पावन वातावरणाचा अनुभव घेतला. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या या महाकुंभ मेळ्याला नुकतीच निर्माता आणि अभिनेता स्वप्नील जोशीने भेट दिली. शिवाय पवित्र स्नान करून दैवी आशीर्वादसुद्धा घेतले. (Swapnil Joshi took holy bath in Mahakumbh 2025)
स्वप्नीलने केले पवित्र स्नान
अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम वेगवेगळ्या देवस्थानांना भेट देताना दिसतो. अशातच नुकताच स्वप्नील महाकुंभ मेळ्यात सामील झाला होता. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने या पवित्र स्थानाचे दर्शन आपल्या चाहत्यांना घडवले आहे. महाकुंभ मेळ्याची खास झलक त्याने चाहत्यांना दाखवली आहे. दरम्यान, महाकुंभ मेळ्यात सामील झालेल्या अभिनेत्याने त्रिवेणी संगम येथे जाऊन पवित्र स्नानदेखील केले. स्वप्नीलने भक्तिमय वातावरणात दंग होऊन एका अनोख्या अनुभवाचा आनंद घेतला.
हा दैवी आशीर्वाद वाटतो
अभिनेता स्वप्नील जोशीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा खास अनुभव शेअर केला आहे. यावेळी त्याने लिहिलंय, ‘महाकुंभ 2025.. आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय अनुभव! प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 ला उपस्थित राहण्याचा आणि महासंगमात पवित्र स्नान करण्याचा योग आला. हा दिव्य प्रवास अनुभवण्याचे भाग्य लाभले. कुटुंब आणि प्रियजनांसाठी प्रार्थना केली, सकारात्मक ऊर्जा आत्मसात केली, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! या अद्भुत महाकुंभाचे साक्षीदार होण्याचा सन्मान मिळणं, हा दैवी आशीर्वाद वाटतो’.
View this post on Instagram
‘हा सनातन धर्म, मानवता, प्रेम आणि भक्तीचा सर्वात मोठा उत्सव! या क्षणाची अनुभूती शब्दांत मांडता येणार नाही.. खरंच दिव्य अनुभव! हर हर गंगे! नमामि गंगे! जय हिंद! जय भारत!’ स्वप्नीलची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होतेय. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या कारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणाऱ्या स्वप्नीलची अध्यात्मिक बाजू देखील तितकीच खास असल्याचे यातून दिसते.
हेही पहा –