घरमनोरंजनपडदा व्यापूनही उरलेले ‘ठाकरे’

पडदा व्यापूनही उरलेले ‘ठाकरे’

Subscribe

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वादळी जगणं एका सिनेमात मावणारे नाही, हे जरी खरे असले तरी ठाकरे चित्रपटाच्या पडद्यावरून समोर येणारं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या राजकीय नेत्यापलिकडे असलेल्या व्यक्तीमत्वाचे माणूस म्हणून असलेले पैलू चित्रपटातून हरवले आहेत. शिवसेनाप्रमुख, महाराष्ट्राच्या राजकारणावर पाच दशके अमिट प्रभाव असलेले नेते, व्यंगचित्रकार, निर्भिड, रोखठोक वक्तव्ये करून कार्यकर्त्यांमध्ये अंगार फुलवणारे नेते, कडवे हिंदुत्ववादी बाळासाहेब, शिवसेना-भाजपच्या युती सरकारवरील रिमोट कंट्रोल असे अनेकविध पैलू असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या याच अनेकविध व्यक्तीमत्वाला पडद्यावर समोर आणण्याच्या प्रयत्नात त्यांच्यातल्या माणूसपणाचे दर्शन चित्रपटातून खूपच तोकडे झालेले आहे. शरद पवार, जॉर्ज फर्नांडीस यांच्यासोबत असलेला राजकीय विरोध आणि मतभेदापलिकडेही मैत्रीचे नाते जपणारे बाळासाहेब चित्रपटातून पुरेसे उलगडलेले नाहीत. मात्र तीन तासांत बाळासाहेबांना पडद्यावर साकारण्याचा नवाजुद्दीन आणि अभिजीत पानसेंचा प्रयत्न कौतूकास्पद आहे.

बाळासाहेबांना महाराष्ट्रातील मराठी माणसाचा नायक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करण्याची गरज तितकीशी नव्हती. शिवसेनेची स्थापना आणि त्याचा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहेच. मात्र हाच नायक केवळ राजकीय नायक म्हणून सादर करण्यासाठीच दिग्दर्शक आणि पटकथा पडद्यावर खर्च झालेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त राजकीय संदर्भांचा पट म्हणून ठाकरे हा चित्रपट समोर येतो. शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्णय आणि आंदोलनामागे तत्कालीक अशी काही कारणे होती. या कारणांचा पट दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटांत पुरेपूर झाला आहे. त्यातून शिवसेनेची भूमिका आणि बाजू मांडण्याचा प्रयत्न आहे. आपली भूमिका, वक्तव्य जगाला पटो अथवा न पटो, त्यावर कोण काय म्हणतंय? याची फिकीर बाळासाहेबांनी कधी केली नाही. मात्र चित्रपट साकारताना ही फिकीर दाखवण्याची गरज का पडावी? असा प्रश्न चित्रपट पाहताना पडतो. त्यामुळे बाळासाहेबांचे इतिहासातले अस्तित्व आणि आजचा चित्रपटातील त्यांचा भास यातील फरक गडद होत जातो. पार्श्वसंगीत, संवाद, दृष्यांचा योग्य वापर झाला आहे. जॉर्ज फर्नांडीस यांच्यासोबतचे कोठडीतील प्रसंगातून राजकीय मतभेदाच्या पलिकडेही मैत्रीचा ओलावा कायम ठेवणारे बाळासाहेब समोर येतात. तर शरद पवार यांच्यासोबतच्या संवाद आणि प्रसंगातूनही ही बाब समोर येते. त्या काळातल्या आणि आजच्या काळातल्या राजकारणातील खालावलेली पातळी यातून स्पष्ट होत जाते.

प्रबोधनकार ठाकरे यांचे वैविध्यपूर्ण व्यक्तीमत्व, देशाच्या राजकारणात बाळासाहेब नावाच्या पर्वाची सुरुवात, मार्मिक नियतकालीकाची गरज यामुळे मध्यंतरापूर्वीचा चित्रपट सशक्त झाला आहे. मात्र, मध्यंतरानंतर केवळ राजकीय घटनांचा पट उलगडत गेल्याने सुरुवातीचा परिणाम हळू हळू कमी होत जातो. अराजकीय व्यक्तींसोबतची बाळासाहेबांची मैत्री, साहित्य, कला, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे मित्र त्यांच्याशी होणारी थट्टामस्करी, त्यातील काही मनोज्ञ क्षण चित्रपटातून टिपता आले असते, मात्र तसे झालेले नाही. पडद्यावर बाळासाहेब कायम तणावात दाखवण्याची गरज नव्हती, चित्रपटाच्या पुढील भागात ही बाब टाळता यायला हवी.

- Advertisement -

संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मुंबईतील गिरणी कामगारांचे आंदोलन, दलित आदिवासी आणि लाल बावट्याची चळवळ, आणीबाणीचे महाराष्ट्रातील राजकारणावर आणि नव्वदच्या दशकातील जागतिकीकरणाच्या धोरणानंतर महाराष्ट्रावर झालेले त्याचे परिणाम. महाराष्ट्राच्या इतिहासातील अशा अनेक महत्वाच्या घटनांचा विचार चित्रपटातून पुरेसा झाला नाही. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी माणसाच्या मुद्द्यानंतर आक्रमक हिंदुत्वाच्या विषयाकडे वळलेले बाळासाहेब आणि शिवसेना भाजपचे युती सरकारची कारकिर्द या विषयापर्यंत ठाकरे चित्रपटाचा पहिला भाग येऊन थांबतो. त्यामुळेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या दुर्लक्षित इतिहासातले पैलूंची उत्तरे चित्रपटातून येत नाहीत. बायोपिकमध्ये तशी गरजही नसते. बाळासाहेब हे राजकीय नायक होते, हे जरी खरे असले तरी एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तीमत्वाची उंची दाखवण्यात ठाकरे चित्रपट काहीसा कमी पडला आहे. त्याच्या पुढील भागात ही उणीव भरता काढता येईल.

चित्रपट फ्लॅशबॅकमधून पुढे सरकतो, त्यासाठी ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट किंवा इस्टमनकलर सदृश्य पद्धतीने केलेल्या चित्रिकरणातून ६० ते ९० च्या दशकांपर्यंतचा पट समजून येतो. नवाजुद्दीन सिद्दीकीचा सहज वावर आणि बाळासाहेब ठाकरे नावाच्या अनेकांगी व्यक्तीमत्वात त्याने हळूच केलेला शिरकाव या दोन्हीसाठी त्याचे कौतूक व्हायलाच हवे. शिवसेनेच्या सुरुवात आणि ऐन भराच्या काळात ७० ते ८० च्या दशकातील शिवसेनेतील नेते वामनराव महाडीक, दत्ता साळवी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर यांचे प्रसंग त्रोटक झाले आहेत. तर मनोहर जोशींच्या व्यक्तीरेखेने पडदा बर्‍यापैकी व्यापला आहे. प्रेक्षकांवर चित्रपटाचा होणारा परिणाम मोठा आहेच, त्यात अर्धेअधिक यश केवळ पडद्यावर नाही तर प्रत्यक्ष जीवनातही एक नेते आणि नायक असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -