घरमनोरंजनगीतातील संवेदनशिलता आणि आवाजातील माधुर्य यांचा मिलाप

गीतातील संवेदनशिलता आणि आवाजातील माधुर्य यांचा मिलाप

Subscribe

अल्बमचे स्वतंत्र असे युग मधल्या काळामध्ये आले होते. एकाच अल्बममध्ये अनेक गाणी ऐकायला मिळत होती. त्यानिमित्ताने स्वतंत्र असे गाण्याचे चित्रीकरणही केले जात होते. आता सोशल नेटवर्कच्या माध्यमातून निर्मात्याला, गायकाला जे गाणे हिट वाटते, त्याचे प्रसारण केले जाते. पण दोन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गीतकार, गायक एकत्र आले तर पुन्हा अशा अल्बमचे रसिक प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत होईल यात काही शंका नाही. ज्यांचे नाव घेतल्याने गाण्याचे वेगळे विश्व नजरेसमोर येते अशा गीतकारांमध्ये कवी, दिग्दर्शक गुलजार आणि गायक पंकज उधास यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते. व्हेल्वेट व्हॉयसेस कंपनीने आपल्या निर्मितीत ‘नायब लम्हे-टाईमलेस मोमेंट्स’ या अल्बमची निर्मिती केलेली आहे. त्यासाठी राष्ट्रीय ख्यातीचे गीतकार म्हणून गुलजार तर गायक म्हणून पंकज उधास यांना प्रथमच एकत्र आणलेले आहे.

‘बारिश’, ‘ना जाने कहाँ’, ‘रात वो रूकी नही’,‘ वो दिन गये’, ‘देखो आहिस्ता चलो’, ‘जलन गर आशा’, अशा सहा गझलांचा आणि नज्म यांचा या अल्बममध्ये समावेश आहे. दीपक पंडीत यांनी ती स्वरबद्ध केलेली आहेत. या दिग्गज गीतकार, गायक यांच्याबरोबर संगीताच्या क्षेत्रात नावाजलेल्या वादक कलाकारांचा सहभाग या अल्बम मधल्या गीतांसाठी लाभलेला आहे. सहा गीतांमध्ये संगीताची जी सुरेल वाटचाल अनुभवायला मिळणार आहे, त्यात एकल गिटारचा अधिक वापर झालेला आहे. संजय जैपूरवाले या वादकाने आपले कसब या अल्बमसाठी दाखवलेले आहे. या कॅसेटचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.

- Advertisement -

उपस्थितांना गीतकार गुलजार यांच्या आवाजात यातल्या काव्यांचा आनंद घेता आला आणि त्यानंतर पंकज उधास यांनी सुरेल आवाजात ती गाणी गाऊनही दाखवली. असा योग प्रकाशित होणार्‍या अल्बमच्या बाबतीत फारसा येत नाही. गीतातील संवेदनशिलता आणि आवाजातील माधुर्य यांचा एकत्र मिलाप म्हणजेच ‘नायब लम्हे-टाईमलेस मोमेंट्स’ हा अल्बम सांगता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -