घरमनोरंजनस्वप्नांच्या बाजाराची काळी बाजू

स्वप्नांच्या बाजाराची काळी बाजू

Subscribe

मधुर भांडारकरचा कॉर्पोरेटमध्ये उद्योग जगतातील काळी बाजू समोर आणणारं कथानक होतं. बाजारचं कथानंक स्टॉक मार्केटची अशीच काळी बाजू समोर आणतं. नातेसंबंध, नैतिकता आणि पैसा यातली ही जीवघेणी स्पर्धा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक गौरव चावला यशस्वी झालाय. कथानकाची चांगली मांडणी. संवाद, उत्तम पटकथा आणि सगळ्यात महत्वाचं सैफ अली खानचा ग्रे शेडमधला शेअर ट्रेडर लक्षात राहतो.

पैसा कमावण्यासाठी मेहनत लागते. असं आपणं ऐकलंल असतं. पण, शेअरबाजारात पैसा कमावण्यासाठी मेहनतीपेक्षा कंपन्यांची गुंतवणूक आणि त्यांची आर्थिक स्थिती यांचं उत्तम आकलन असावं लागतं. स्टॉक मार्केटमध्ये शेअर ट्रेडींग हा स्वतंत्र व्यवसाय करणार्‍या व्यावसायाची भिस्तच या अंदाजांवर असते. ब्रोकर किंवा फुटकळ शेअर्सची खरेदी विक्री करणार्‍यांचे छोटेमोठे व्यावसाय याच शेअर बाजाराच्या चढ उतारावर आधारलेले असतात. शेअर बाजारातील एखाद्या कंपन्यांबाबत दिवाळखोरी किंवा तत्सम पसरवल्या जाणार्‍या चांगल्या वाईट अफवा या सुद्धा या व्यावसायातल्या स्पर्धेतले डाव प्रतिडाव, शह काटशह असतात. नशिबची खेळी आणि आर्थिक अभ्यासातून घेतलेला अंदाज यावर शेअर बाजारातले व्यवहार होतात. यात ज्यांचे अंदाज जास्तीत जास्त खरे ठरतात ते नफ्याचे वाटेकरी होतात, उरलेले या जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर फेकले जातात.

या स्टॉक मार्केट, खरेदी, विक्रीच्या जगात मानवी भावनांना शून्य किंमत असते. जे जास्त संख्येने विकलं जातं तेच मोठ्या संख्येने खरेदी केलं जातं. असं सरळ गणित इथं असतं. इथं पैसा, पैसेवाल्यांच्या पैश्यांकडून खेळला, खेळवला जातो. या बाजारात शेतातल्या म्हातारीसारखा उडणारा पैसा अलगद झेलण्यासाठी आकाशात उडावं लागतं. ही झेप घेण्यासाठी पैशांचा भुकेला माणूस कुठलीही तडजोड करायला तयार होतो. मृगजळ भासणार्‍या या यशासाठी केली जाणारी तडजोड, पैसा, नातेसंबंध, विश्वासघात आदी चांगल्या वाईट भावभावनांचा पट म्हणून बाजार समोर येतो.

- Advertisement -

मधुर भांडारकरचा कॉर्पोरेटमध्ये उद्योग जगतातील काळ्या पांढर्‍या बाजू समोर आणणारं कथानक होतं. स्टॉक मार्केटचा विषय बॉलिवूडमध्ये इतक्या परिणामकारकपणे याआधी समोर आलेला नव्हता. नैतिकता आणि पैसा यातली ही जीवघेणी स्पर्धा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक गौरव चावला यशस्वी झालाय. कुठल्याही किंमतीवर बाजारातला पैसा जिंकण्याची ही स्पर्धा मध्यंतरानंतर मात्र काहीशी रटाळ होते. कथानकासोबतच बाजारच्या पडद्यावरची प्रत्येक व्यक्तीरेखा बुद्धीबळाच्या पटावरील प्यादी बनत जातात. यश, पैशांची भूक आणि व्यवहारी जगातील बदलत्या मूल्यांच्या गर्दीत हरवलेली माणसं स्वतःलाच हरवून जे काय जिंकतात ते बिनकामाचं असू शकतं. हे बाजारमध्ये मांडण्यात आलंय.

रिजवान अली अहमद (रोहन मेहरा) हा अलाहाबादहून स्वप्ननगरी मुंबईतल्या स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमावण्यासाठी आला आहे. इथं स्थिरावण्यासाठी त्याला गॉडफादर म्हणजे शकुन कोठारी (सैफ अली खान) चा हात मिळणं गरजेचं आहे. पण शकुन कोणतीही गोष्ट पैशांच्या फायद्याविना करत नाही. अगदी नातेसंबंधही फायद्या तोट्याच्या दुर्बिणीतून पाहाणारा तो स्टॉक मार्केटमधला जुना ट्रेडर आहे. शेअर ट्रेडींगमध्ये नफा कमावण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. पैशांच्या या शेअर बाजारात रिजवान आणि शकुन एका गटात असतात खरे पण ते शेअर्सच्या बाजारातले एकमेकांचे प्रतिस्पर्धीही होतात. यासाठी आवश्यक पुरेसे प्रसंग चित्रपटात आहेत.

- Advertisement -

सैफ अली खानने ग्रे शेडमध्ये साकारलेला शकुन कोठारी उत्तम जमून आलाय. तरुणाईच्या पैशांच्या भुकेच्या धगीवर आपली पोळी भाजण्याचं कौशल्य त्याने संयत अभिनयाने उत्तम उभं केलंय. चित्रपटांत कुठेही हाणामारीचे किंवा टोकाचे भावनिक प्रसंग नाहीत. प्रेम किंवा नैतिकता, माणुसकी असलं काहीही पडद्यावर नाही. केवळ नात्यातल्या तडजोडी आहेत. या तडजोडीचं प्रतिकात्मक रुप म्हणून राधिका आपटे समोर येते. या पैशांच्या बाजारातून आलेलं एकाकी, उद्ध्वस्तपण तिने प्रिया रायच्या या भूमिकेतून उभं केलंय. सुख ओरबाडण्याची ही सवय, स्पर्धा प्रिया आणि रिझवानच्या नात्यातही पडद्यावर दिसते. त्यासाठी इंटिमेंट सीन्सचा पुरेपूर वापर दिग्दर्शकाने केलाय. बाजारची कथा पटकथा आणि संवाद हे घटक परस्परांना पूरक आहेत. दिग्दर्शकाने त्यातलं संतुलन बर्‍यापैकी ठेवलंय.

स्टॉक मार्केटमधल्या घडामोडींपासून कनिष्ठ मध्यमवर्गीय तसा बाजूलाच असतो. या कोट्यवधीच्या आकडेमोडीत तो तितकासा सामील होत नाही. इथलं मार्केट, शेअर्सच्या किंमती त्यातील चढउतार याची सातत्याने दिली जाणारी माहिती समोर येत असते. अमुक कंपन्यांच्या शेअर्सचे दर कमी झाले, वधारले, सेन्सेक्स, शेअरबाजार गडगडला अशा बातम्या आपण वाचत असतो. या सर्व घडामोडीही जाणीवपूर्वक घडवल्या जाऊ शकतात. सेन्सेक्सच्या पडद्यापलिकडेही एक मोठं आर्थिक राजकारण सुरू असतं. जिथं पैशांनी बलाढ्य असलेल्या कंपन्या, राजकारणी, सरकारी यंत्रणांकडून अनेक बेकायदा व्यवहार आर्थिक तपास यंत्रणांना अंधारात ठेवून केले जात असतात. ही काळी बाजू बाजारच्या पडद्यावरून समोर मांडली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -