बालकलाकार असल्याचा अनुभव आता कामी येईल – स्पृहा जोशी

स्पृहाने बालकलाकार असताना अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शोसाठी पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा थोडाफार अनुभव तिला नक्कीच आहे. आपल्या या अनुभव आणि नव्या भूमितेबाबत स्पृहाने आपलं महानगरशी केलेली खास बातचीत...

spruha joshi
स्पृहा जोशी

कवयित्री, गीतकार आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रेक्षकांसमोर वेगळ्या भूमिकेत येणार आहे. ‘सूर नवा ध्यास नवा’ चे दुसरे पर्व ‘छोटे सूरवीर’ या रिअ‍ॅलिटी शोसाठी ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. स्पृहाने बालकलाकार असताना अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. त्यामुळे रिअ‍ॅलिटी शोसाठी पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा थोडाफार अनुभव तिला नक्कीच आहे. आपल्या या अनुभव आणि नव्या भूमितेबाबत स्पृहाने आपलं महानगरशी केलेली खास बातचीत…

१. आतापर्यंत अनेक रूपात तुला प्रेक्षकांनी बघितलं आहे, आता अँकरच्या भूमिकेत तू दिसणार आहेस, काय सांगशील ?

– मला कायमच वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. माझं नशीब चांगला आहे की मला प्रत्येक वेळी वेगळं काही करण्याची संधी मिळते. त्यामुळे मला कायमच विविध भूमिका करून बघुयात असं नेहमी वाटतं. सूत्रसंचालकाची नवी जबाबदारी या शोच्या निमित्ताने माझ्यावर आली आहे. मी या आधी अनेक कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं. पण एका रिअ‍ॅलिटी शोसाठी मी पहिल्यांदाच सूत्रसंचालन करणार आहे.

२. तू पहिल्यांदा रिअ‍ॅलिटी शोसाठी निवेदन करत आहेस,काय विशेष तयारी केली आहेस?

– खरं सांगायचं तर मी या पर्वासाठी खास अशी तयारी केलेली नाही. कारण इथे सगळी लहान मुलं आहेत. तुम्ही लहान मुलांसमोर जाताना काहीच वेगळी तयारी करून जाऊ शकत नाही. मुलं कोणत्या प्रसंगाला कशी व्यक्त होतील हे सांगू शकत नाही. लहान मुलं खूप हुशार असतात. ते फार विचार करून एखाद्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपल्याला खूप विचार करावा लागतो. आतापर्यंत मी अनेक स्टेज शोचं निवेदन केलं त्या अनुभवाचा उपयोग मला इथे नक्कीच होईल.

३. या कार्यक्रमातून स्पृहाच्या कविता प्रेक्षकांना ऐकायला मिळतील का?

आता माझं असं काहीच ठरलेलं नाही. निवेदनासाठी काय वेगळं करता येईल याचा विचार केला नाही. पण ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाचा लेखक वैभव जोशी हा स्वत: एक कवी आणि गीतकार आहे. तो उत्तम कविता करतो. त्यामुळे मुळातच त्याच्या लिखाणात एक प्रकारे काव्य आहे. पण जसजसा हा कार्यक्रम रंगत जाईल त्यावेळी मी प्रेक्षकांसाठी एखादी कविता नक्की ऐकवीन.

४. लहान मुलांच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते, याबाबत काय सांगशील ?

माझ्या अनुभवावरून मी पालकांना सांगेन. मी स्वत: बालकार होते. त्यामुळे अचानक मिळणारी प्रसिध्दी मी अनुभवली आहे. हवा डोक्यात जायला अजिबात वेळ लागत नाही. अशावेळी कायम माझ्या आई बाबांनी सांगितलं, पैसे आणि प्रसिध्दी हा मुद्दा आला की आपल्यापेक्षा खाली कोण आहे ते बघायचं आणि टॅलेण्टमध्ये कायम आपल्यावर कोण आहे तेही बघायचं. यामुळे आपल्याला जमिनीवर राहायला मदत होते. हा सगळ्यात महत्त्वाचा धडा असतो. अशा पद्धतीच्या स्पर्धांच टेन्शन मी स्वत: अनुभवलं आहे. त्यामुळे या सगळ्यात पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. एकतर तुम्ही खूप यशस्वी होता, नाहीतर निराशेच्या गर्तेत जाता. अशावेळी तुमचे सगळ्यात जवळचा मित्र हे तुमचे आई – बाबा असतात.

५. तुझ्या नवीन भूमिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील ?

अनेक दिवस मी टीव्हीवर नव्हते. अनेक मालिका केल्यानंतर जाणीवपूर्वक मी टीव्हीपासून दूर राहिले. या मधल्या काळात मी अनेक नाटकांमधून कामं केली. अनेक चित्रपट केले. पुन्हा टेलिव्हीजनवर परत येण्यासाठी ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या निवेदनाची उत्तम संधी मला मिळाली. माझ्या पहिल्या मालिकेपासूनच प्रेक्षकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आहे. मला खात्री आहे यापुढेही ते माझ्यावर असंच प्रेम करतील.