घरमनोरंजननाईटक्रॉलर भाग २

नाईटक्रॉलर भाग २

Subscribe

यातील जवळपास सर्वच पात्रं समांतर आहेत. म्हणजे त्यांची परिस्थिती, कामं, वगैरे भौतिक गोष्टी वगळता ती सारखीच आहेत. कारण यांचं आयुष्य फक्त यश, नेहमी सर्वश्रेष्ठ राहण्याची गरज आणि पैसा याभोवतीच फिरत राहतं. मग तो लु असो किंवा निना किंवा रिक, जो, वगैरे कुणीही. थोडक्यात, ही सर्व माणसं आपल्यातीलच बहुतांशी लोकांचं प्रतिनिधित्व करतात. फक्त फरक इतकाच आहे की त्यांच्यात एक्स्ट्रिमीझम आहे. कारण आपल्याला यश, प्रसिद्धी, पैसा ही भौतिक सुखं हवी आहेत. पण आपण स्वतःला एका चौकटीत बांधून ठेवलेलं आहे. आणि आपलं असं या चौकटीत राहणंच आपल्याला या पात्रांपासून भौतिक दृष्ठ्या वेगळं ठरवतं. पण तरीही शेवटी आपला मानवी स्वभाव त्यांच्याशी आपलं नातं आहे, हे नाकारू शकत नाही.

लु हा तिशीपार केलेला माणूस आहे. ज्याने जागतिकीकरण, भांडवलशाही, अमेरिकेतील ढासळत असलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, यासारख्या गोष्टी पाहिल्या आणि अनुभवलेल्या आहेत. त्यात तो अजूनही स्थिर नाही. त्यामुळे नोकरी मिळवणं आणि मिळालीच तर ती टिकवणं फार अवघड आहे, हे तो जाणून आहे. त्यामुळे त्याला संधी मिळताच तो नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यात टिकून राहण्यास पसंती देतो.

तर निना पन्नाशीपार स्त्री आहे. तिनेही लुने पाहिलेल्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेतच. पण त्याहूनही अधिक ती त्या सर्व परिस्थितीतून गेली आहे. आता तिला नोकरी आहे. पण दर दोन तीन वर्षांनी तिला त्या नोकरीवर पाणी सोडावं लागत असल्याचे तिचा भूतकाळ पाहता ती फार काळ टिकेल असं दिसत नाही. त्यामुळे तिला तिची ’पोझिशन’ कायम ठेवण्यासाठी चॅनेलचे रेटिंग्ज वाढवण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी लुची गरज आहे. त्यामुळे तिला त्याने काहीही करायला भाग पाडलं तरीही तिला ते करावंच लागणार आहे. थोडक्यात तीही या चक्रात अडकलेली आहे.

- Advertisement -

रिक हा विशीपार असलेला तरुण ग्रॅज्युएशन होऊनही बेरोजगार आहे. त्यामुळे त्याला काहीही करून नोकरीची गरज आहे. त्यामुळेच तो पैशाअभावी, नाइलाजास्तव लुकडे काम करतोय. त्यातही त्याची ही परिस्थिती पाहून लु त्याचं शोषण करतोय. त्याला सुरूवातीला लु काय करतोय, ते अनधिकृत आहे का, वगैरे प्रश्न पडतात. पण जेव्हा प्रश्न ही तत्वं बाजूला ठेवून स्वतःचा फायदा करवून घ्यायचा येतो, तेव्हा तोदेखील अनधिकृत कामं करायला मागे पाहत नाही.

त्यामुळे म्हटली तर ही पात्र एकमेकांविरुद्ध आहेत आणि म्हटली तरही एकमेकांना पूरक आहेत. कारण प्रत्येकाचं आयुष्य दुसर्‍याला काहीतरी देऊन जाणार आहे. त्यामुळे त्यांचं प्रत्येकाचं एकत्र असणं आणि एकमेकांना सहकार्य करणं आवश्यक आहे. पण ही चेन तोडली तर काय होईल? तेच आपल्याला ’नाइटक्रॉलर’मध्ये शेवटच्या टप्प्यात दिसतं. आणि तिथेही नाइटक्रॉलर त्याचा प्रभाव पाडतो.

- Advertisement -

ही पात्रं आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी; थोडक्यात स्वतःचं यश आणि पैशाचं वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःचं आयुष्य आहे तसंच चालू ठेवण्यासाठी शक्य आहे ते सगळं करण्यास तयार आहेत. हे वर्तुळ आहे, हे मान्य. ते चालू रहायला हवं हेदेखील मान्य. पण ते तुटलं तर काय होईल, म्हणजे खरं तर नाइटक्रॉलर. चित्रपट हे दिग्दर्शकाचं आणि नाटक हे लेखकाचं माध्यम आहे असं म्हणतात. पण इथे मात्र हे दोन्ही समज खोटे ठरवत या दोन्ही गोष्टी चित्रपटाकरिता आवश्यक असलेल्या इतर गोष्टींप्रमाणेच एकत्र येऊन चित्रपट तयार होतो. पटकथेत कुठेच फापटपसारा नाही. किंवा चित्रपटातही गरजेची नसलेली दृश्यं नाहीत. तर फक्त आणि फक्त समोरील पात्रांची कथा सांगण्यापुरती, दाखवण्यापुरती आवश्यक दृश्यं दिसतात. यातील लु हा अँटी हिरो त्याच्या स्वभावाबाबत मार्टिन स्कॉर्सेसीच्या ’टॅक्सी ड्राइव्हर’शी आणि ’द किंग ऑफ कॉमेडी’शी नातं सांगतो. ज्यामुळे यात वेडेपणा आणि डार्क कॉमेडी दोन्ही समप्रमाणात आणि सूचकरित्या वापरली आहे. कुठेच तिचा अतिरेक नाही.

चित्रपटभर निओ-न्वार शेड्स आणि वातावरण निर्माण केलेलं आहे. कुठल्याही फ्रेममध्ये फक्त रंगांमधून त्या पात्राची किंवा त्या विशिष्ट दृश्यातील मानसिकता सूचित करण्यासाठी जे मोजके चित्रपट नावाजले जातात, त्यात याचाही समावेश करता येतो. हा चित्रपट जितका लु साकारणार्‍या जेकचा आहे तितकाच दिग्दर्शक लेखक डॅन गिलरॉयचा आहे. चित्रपटात काही घटनांबाबत जितकी सूचकता वापरली आहे, त्याबाबत डॅनचं कौतुक करावंसं वाटतं. कारण बर्याचदा फक्त सजेशन्समधून कथा सांगितली आहे. मग ते सजेसिव्ह सेक्स असो वा एखाद्या पात्राचं अनधिकृत कृत्य वा इतर काही. त्याकरिता ती घटना पडद्यावर दिसायलाच हवी असं नाही. तर फक्त त्याची सूचकता दाखवून इतर काम प्रेक्षकांवर सोपवणं, हा निर्णय योग्य वाटतो. कथा, पटकथा, अभिनय ते दिग्दर्शन अणि संकलन सर्वांबाबतच नव्हे तर मानसशास्त्रीय दृष्टिकोन, जागतिकीकरण, भांडवलशाही, या सर्वांचा विचार करून उभा केलेला हा नाइटक्रॉलर नावाचा कॅनव्हास 2014 मधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे याबद्दल शंकाच नाही.

– अक्षय शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -