घरमनोरंजनदि फॅमिली मॅनचा दुसरा सिझनही 'सुपरहिट'!

दि फॅमिली मॅनचा दुसरा सिझनही ‘सुपरहिट’!

Subscribe

मनोज वाजपायी आणि समन्था यांच्या दमदार अभिनयामुळे दि फॅमिली मॅन सीजन २ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

थिएटर्स, मल्टीप्लेक्स ही मनोरंजनाची ठिकाणं सध्याच्या घडीला बंद असताना वेबसीरिजचे मार्केट मात्र तेजीत सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, झी ५ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या वेबसीरिजने युवा पिढीसह सर्वांनाचा भुरळ घातली आहे. वेबसीरिजच्या या भाऊ गर्दीत ठराविकच सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकून जाण्यात यशस्वी ठरताना दिसतात. अशीच एक सीरिज किंबहुना वेबसीरिजचा दुसरा सिजन सध्या धुमाकूळ घालत आहे. अभिनेता मनोज वाजपायी याची दि फॅमिली मॅन सिजन २ हा ४ जून रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि नेटकऱ्यांनी तो रातोरात पाहिलाही. क्वचितच कोणत्याही वेबसीरिजचा दुसरा सिजन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. मात्र दि फॅमिली मॅन २ त्याला अपवाद ठरला आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपायीसह अभिनेत्री प्रियामणी, सीमा बिस्वास, शदर केळकर, शब्बीर हाशमी, दर्शन कुमार, दलिप ताहिल यांसारख्या कलाकारांनी ही सीरिज रंजन बनवण्यास आपले योगदान दिले. परंतू दि फॅमिली मॅन सीजिन २ विशेष लक्ष वेधून घेते ती म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार समन्था अक्कीनेनी हिच्या राजी या भूमिकेमुळे.

- Advertisement -

स्पेशल टास्क फोर्स ऑफिसर श्रीकांत तिवारीच्या भूमिकेतील मनोज वाजपायी आणि श्रीलंकन रिफ्युजी राजी बनलेली समन्था यांच्या दमदार अभिनयामुळे दि फॅमिली मॅन सीजन २ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. समन्थाची ही पहिलीच हिंदी वेबसीरिज असून तिच्या नॉन ग्लॅमरस लुकमधील राजीची भूमिका तिने चपखल साकारली आहे. सीरिजच्या पहिल्या सीजनमध्ये उत्तर भारतातील काश्मिर आणि दिल्लीशी संबंधीत याचे कथानक पाहायला मिळाले होते. तर दुसऱ्या सीजनमध्ये दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू या प्रदेशांशी संबधीत हे कथानक आहे, त्यामुळे काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंतच्या प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्याचा या सीरिजचा प्रयत्न असल्याचे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

- Advertisement -

दुसऱ्या सिजनमध्ये एकूण नऊ एपिसोड असून पहिले चार एपिसोड रटाळ आणि कंटाळवाणे वाटले तरी पाचव्या सिजनपासून ही सीरिज पकड धरायला सुरूवात करते. टिपिकल सर्वसामान्य माणसाचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारा श्रीकांत जेव्हा आयटी कंपनीतील नोकरी सोडून पुन्हा टास्क फोर्समध्ये सामील होतो तेव्हा खरे कथानक फुलू लागते. सीरिजमध्ये प्रत्येक कलाकाराने त्यांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मात्र भाव खाऊन जाते ती सावळी, विना मेकअपची रिबेलर राजी. अभिनय, अॅक्शन आणि लुक्स या सगळ्यातच तिने श्रीकांतला जोरदार टक्कर दिली आहे. नेटकऱ्यांना जर ही सीरिज पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटली तर त्याचे श्रेय नक्कीच मनोज वाजपायीसह अभिनेत्री समन्था अक्कीनेनी हिला जाईल. शिवाय दुसरी सीरिज संपतानाच त्यांनी तिसऱ्या सीरिज उत्सुकतादेखील प्रेक्षकांमध्ये निर्माण केली आहे. ती काय आहे तर तर दि फॅमिली मॅन २ पाहिल्यावर समजेल.

हेही वाचा – 

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -