घरमनोरंजनभटकळांनी जपली गुरुविषयीची आत्मियता

भटकळांनी जपली गुरुविषयीची आत्मियता

Subscribe

एखादी कला आत्मसात करायची म्हणजे गुरुकडे अनेक वर्षे रियाझ करावा लागतो. छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा दिली जाते. नाही म्हटल तरी या गोष्टीसाठीसुद्धा दोन दशकांहुन अधिक काळ द्यावा लागतो, पण आजची जीवनशैली ही गतीशील झालेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे प्रतिक्षा करणे आजच्या कलाकारांना माहीत नाही. गुरुंनी रियाझ, तालीम या गोष्टींना महत्त्व न देता झटपट यशाचा मार्ग सांगावा अशी शिष्याची इच्छा असते. त्यामुळे ज्या पद्धतीने गुरु-शिष्य परंपरा पुढे यायला पाहिजे ती आता थांबलेली आहे. शिष्याकडून गुरुविषयी आदर व्यक्त केला जाईलच याची खात्री देता येत नाही. याचा अर्थ गुरु-शिष्याचे नाते कायमचे कोलमडून पडले आहे असे सांगता येत नाही. ज्या कलाकारामध्ये भावना आहे, संवेदना आहे, मानवी नातेसंबंधांबद्दल आदर आहे त्यांनी शिष्य या नात्याने गुरुबद्दल आदर व्यक्त केलेला आहे. इतकेच काय तर छोटेखानी कार्यक्रम करुन त्यांच्या कार्याला आदरांजलीही दिलेली आहे. रामदास भटकळ हे प्रकाशक, लेखक म्हणून आपल्याला जास्त परिचयाचे आहेत. पण ते शास्त्रीय गायकही आहेत. दिवसभर पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करत असताना नित्यनियमाने रियाझ करणे, सुर आळवणे या गोष्टी त्यांनी सातत्याने केलेल्या आहेत.

संगीताचार्य एस पी आर भट्ट यांचे शास्त्रीय संगीतात सन्मानाने नाव घेतले जात होते. ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. खयाल-आग्रा घराण्याशी त्यांचे नाव जोडले जात होते. प्रख्यात श्रीकृष्ण नारायण्अ रतनझणकर यांच्याकडून भट्ट यांनी शस्त्रीय संगीताचे धडे घेतले होते. भटकळ यांनी या भट्टांना आपले गुरु मानले होते. कामाच्या व्यापामुळे शास्त्रीय गायनाला भटकळ यांना फारसा वेळ देता आला नाही, परंतु संगीताबद्दलची आत्मियता त्यांनी छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून व्यक्त केलेली आहे. एकंदरीत संगीत आणि लेखन यांचा आजच्या स्थितीत मागोवा घेतला तर बर्‍याचजणांची जन्मशताब्दी साजरी केली जात असल्याचे पहायला मिळते. त्यातही ज्यांचा बोलबाला त्यांची जन्मशताब्दी साजरी होताना दिसते आहे. अभिनेते दिवंगत रमेश भाटकर यांनी आपले वडील संगीतकार, गायक स्नेहल भाटकर यांच्या जन्मशताब्दीविषयी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याविषयी नाराजी व्यक्त केली नसती तर एखाद दुसरा कार्यक्रमही त्यांच्या नावाने झाला नसता. भट्ट यांचीसुद्धा जन्मशताब्दी आहे. त्यांचे योगदान लक्षात घेऊन काही वेगळे व्हायला हवे होते, ते झालेले नाही. पण त्यांचे शिष्य रामदास भटकळ यांनी जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. भारतीय विद्या भवनमध्ये 12 मार्चला सायंकाळी 5 वाजता होणार्‍या कार्यक्रमात भटकळ स्वत: सहभागी होणार आहेत. सुनिती गांगुली, मीरा भागवत यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -