घरमनोरंजनबायोपिकचं पीक

बायोपिकचं पीक

Subscribe

पौराणिक, ऐतिहासिक, क्रांतिवीर, राजकीय नेते, खेळाडू अशी बायोपिक चित्रपटांची वाटचाल आहे. सर्वसाधारण निधन झालेल्या, हयातीत असलेल्या अशा दिग्गज व्यक्तींचा या बायोपिकसाठी विचार झालेला आहे. आता येत असलेले बायोपिक चित्रपट लक्षात घेता त्यात व्यक्तीपेक्षा त्यांचे ज्या राजकीय पक्षात वावरणे होते, त्याविषयीच अधिक चर्चा होताना दिसते. एकंदरीत बायोपिकचे आलेले पीक लक्षात घेता येणारी लोकसभा निवडणूक हा पिकांसाठी हंगाम असल्याचे लक्षात येते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर ‘ठाकरे’, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘पी एम नरेंद्र मोदी- देशभक्तीही मेरी शक्ती है’ असे चित्रपट येऊ घातलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर मौलाना आझाद यांच्या जीवनावर आधारित ‘वो जो था एक मसीहा मौलाना आझाद’ हा चित्रपट येत आहे, त्यानिमित्ताने.

जगभरात होणारे चित्रपट महोत्सव लक्षात घेता त्यात भारतीय चित्रपटांचे नाव गौरवाने घेतले जाते. त्याचं कारण म्हणजे चित्रपट निर्मितीबरोबर साहित्याची, नाटकाची उज्ज्वल परंपरा भारतात आहे. दर्जेदार साहित्यावर चित्रपट निर्मिती करायची झाली तरी असंख्य विषय चित्रपटाला मिळू शकतात. असं असताना भारतातल्या निर्मात्यांनी अगदी राज्यातल्या भाषेसाठी काम करणार्‍या दिग्दर्शकाने अनुकरण करणार्‍या चित्रपटाला जास्त प्राधान्य दिलेले आहे. प्रेक्षकांना काय आवडतं याचा विचार यात प्रामुख्याने झालेला दिसतो. भारतीय चित्रपटाचा बदलता टप्पा लक्षात घेतला तर प्रत्येक टप्प्याला ठरावीक अशा विषयाची, सादरीकरणाची लाट आलेली आहे आणि त्या लाटेत अनेकांनी अनुकरण करणारे चित्रपट केलेले आहेत. असे केल्याने फार मोठा बदल झालेला आहे असे म्हणता येणार नाही. एखाद दुसर्‍या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालेले आहे. अन्यथा तो चित्रपट त्या लाटेत फक्त चर्चा करणारा ठरलेला आहे.

गेल्या तीन दशकांचा मागोवा घेतला तर गुन्हेगारी पटाची लाट आली होती. त्यात राम गोपाल वर्मा याने बाजी मारली होती. जेवढे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर हे चित्रपट बेतलेले होते. पुढे जागतिक पातळीवर ज्या खेळाडूंनी खेळात प्रावीण्य मिळवले होते, त्यांच्यावरसुद्धा एकामागोमाग एक असे चित्रपट आले होते. ‘मिल्खा सिंग’ पासून ते अगदी ‘फोगाट’ कुटुंबियांपर्यंत हे चित्रपट आले होते. सचिन तेंडुलकर, अझरूद्दीन यांच्यासुद्धा नावाचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटावर प्रेक्षकांत झालेली चर्चा लक्षात घेता जागतिक कीर्तीचे अनेक खेळाडू बायोपिकच्या निमित्ताने पडद्यावर झळकणार आहेत.

- Advertisement -

चित्रपट, मालिकांचा एकंदरच प्रवास लक्षात घेता यात सर्वांत जास्त बाजी मारली ती भगतसिंग या व्यक्तिमत्त्वाने. कृष्ण-धवलच्या युगात भगतसिंगवर चित्रपट आला होता असं असताना पुन्हा जेव्हा याच भगतसिंगवर चित्रपट निर्मिती करायचे ठरले तर एकाच वर्षात चार कलाकृती आल्या होत्या. असा प्रयत्न आजवर कोणत्याही नामवंत व्यक्तीच्या बाबतीत झालेला नव्हता. अजय देवगणला घेऊन ‘द लिजंडस ऑफ भगतसिंग’ सोनू सूदला घेऊन ‘शहीद-ए-आझम’, सागर फिल्म्सच्यावतीने मालिका, चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. हा काळ भगतसिंग यांच्या चाहत्यांना थक्क करणारा होता. सुधीर फडके यांनी सावरकरांवर चित्रपटाची निर्मिती केली होती. पुढे याच सावरकरांवर राजदत्त यांच्या दिग्दर्शनात मालिकाही आली होती.

सध्या कोणत्या गोष्टीची लाट असेल तर ती राजकीय नेत्यांवर एकामागोमाग येणार्‍या चित्रपटांची. यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यावर चित्रपट आलेले आहेत. लालबहादुर शास्त्री, एन. टी. रामाराव, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट तयार झालेले आहेत. येत्या काही दिवसात ते एकएक करून ते प्रदर्शितही होणार आहेत. माणसाचे कर्तृत्व लक्षात घेऊन या चित्रपटांची निर्मिती केली जात असली तरी त्याला येणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. मौलाना आझाद हे पक्षाशी संबंधित असले तरी त्यांनी देशासाठी केलेला त्याग, समर्पण अधिक नजरेत भरते. ‘वो जो था एक मसिहा मौलाना आझाद’ हा चित्रपट १८ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. डॉ. राजेंद्र संजय यांच्याबरोबर संजयसिंग नेगी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. मौलाना आझादची मुख्य व्यक्तीरेखा लिनेश फणसे याने केलेली आहे.

- Advertisement -

इंदिरा गांधींच्या चित्रपटाची घोषणा झाली
राजकीय पार्श्वभूमीवर जेवढे म्हणून चित्रपट आले त्यात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दखल घेतलेली आहे. त्यांच्यावरही चित्रपट करण्याचे निश्चित झाले होते. त्या संदर्भात घोषणाही केली होती. एन. चंद्रा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी मनिषा कोईराला हिची निवडही करण्यात आली होती. पुढे हा चित्रपट काही होऊ शकला नाही. परंतु इंदिरा गांधींची भूमिका करायची तर ती सुप्रिया विनोद हिनेच. हिंदी, मराठी चित्रपट, नाटक या तिन्ही कलाकृतींमध्ये सुप्रियानेच इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकार केलेली आहे.

पुन्हा गांधी चित्रपट
पुण्यामध्ये १० ते १७ जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. यंदा त्याचे सतरावे वर्ष आहे. प्रत्येक वर्षात एक विषय घेऊन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा ‘इन सर्च ऑफ ट्रूथ- सेलिब्रिटींग १५० इअर बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी ऑफ महात्मा गांधी’ ही या वर्षाची थीम आहे. योगायोग म्हणजे रिचर्ड अ‍ॅटनबरो या हॉलिवूडच्या दिग्दर्शकाने महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘गांधी’ हा चित्रपट केला होता ज्याला अनेक ऑस्कर पारितोषिके प्राप्त झाली होती, तो चित्रपट या महोत्सवात दाखवला जाणार आहे. शाम बेनेगल दिग्दर्शित ‘द मेकिंग ऑफ महात्मा’ या लघुपटाचाही यात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -