घरमनोरंजनअसे व्हायला हवे

असे व्हायला हवे

Subscribe

पूर्वी सांस्कृतिक घडामोडींचं क्षेत्र म्हणून लालबाग, परळ हा गिरणगावचा परिसर ओळखला जात होता. आजही इथे कार्यक्रमांची रेलचेल असली तरी त्याचे प्रतिबिंब महाराष्ट्राच्या काही शहरांत उमटायला लागलेले आहे. मुंबई आणि उपनगरीय भागांत प्रेक्षकांनी नोंद घ्यावी असे उपक्रम राबविले जात आहेत. पार्ला, बोरिवली, डोंबिवली परिसरात यांच्याबरोबर आता ठाण्यातही सांस्कृतिक देवाणघेवाण होऊ लागलेली आहे. नाट्य परिषदेच्या निमित्ताने या शहरांत वेगवेगळ्या घडामोडी होत असल्या तरी ठाणे इथे होणार्‍या कार्यक्रमांची रेलचेल आता अधिक वाढलेली आहे. त्याला कारण म्हणजे कलाकारांनी कलाकारांसाठी एकत्र येऊन स्थापन केलेली ‘टॅग’ ही संस्था कोणा एका व्यक्तीची न राहता सभासद म्हणून जेवढे यात सक्रिय आहेत, त्यांची ती झालेली आहे. कलाकार म्हणजे फक्त अभिनय नाही तर रांगोळी, चित्रकला इतकेच काय तर हस्तकलेत प्रावीण्य दाखवणारा कलाकारही या ‘टॅग’ ला महत्त्वाचा वाटलेला आहे. निमित्त घेऊन कार्यक्रम आयोजित केल्याने ठाणेकरांना आणि रसिक प्रेक्षकांना अभिमान वाटावा अशी गोष्ट इथे घडते आहे. हर्षदा बोरकर, सोनाली लोहारकर, निर्मोही फडके, संपदा जोगळेकर-कुलकर्णी या सार्‍याजणी ‘टॅग’ च्या सभासद आहेत. एकत्र येण्याने ‘चार सख्य चोवीस’ हे पुस्तक त्यांच्याकडून लिहिले गेलेले आहे.

‘असे व्हायला हवे’ असे वाटणारे पण सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या तीन महनीय व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होत्या. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेते सचिन खेडेकर सन्माननीय म्हणून उपस्थित होते. मनोगत, कथा वाचन असे काहीसे या कार्यक्रमाचे स्वरुप होते ज्यात सागर तळाशीलकर, ऐश्वर्या नारकर यांचा सहभाग होता. कार्यक्रम नेटका झाला. तो महाराष्ट्राच्या इतरही भागांत पोहोचावा अशी इच्छा तावडे यांनी व्यक्त केली. या चार लेखिकांबरोबर अन्य कलाकारांना प्राधान्य देऊन एक वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल. या पुस्तकातील कथा वाचून कुलकर्णी स्वत: भारवून गेले. या चारही लेखिकांनी जर नाटक लिहिले तर त्याचे दिग्दर्शन करायला आवडेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कथा जरी स्त्रियांनी लिहिल्या असल्या तरी त्या प्रत्येकीचा व्यवसाय हा वेगवेगळा आहे. त्यांची स्वत:ची कलेकडे बघण्याची एक दृष्टी आहे. ही कला समृद्ध करताना या स्त्रियांनी सामाजिक भानही ठेवलेले आहे. त्यामुळे पुस्तक जरी एक असले तरी आनंद हा चौपट आहे. सचिन खेडेकर यांनी पुस्तकाविषयीच्या प्रतिक्रिया इथे व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -