मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी हल्ली केवळ अभिनय एके अभिनय एवढंच करत नाही. त्यांचे काही ना काही व्यवसायही सुरू असतात.तुमच्या आवडत्या अभिनेत्री फक्त अभिनयच करतात असं नाही, तर त्यांच्यापैकी अनेक जणी बिझनेवुमन देखील आहेत. अनेकींनी स्मार्टपणे स्वत:च्या आवडीचे व्यवसाय उभारले आहेत. शूटिंगच्या धावपळीच्या वेळापत्रकातून वेळ काढत त्या स्वत:चा ‘कारोबार’ व्यवस्थित सांभाळत असतात.
तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे – ‘तेजाज्ञा’
तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे या मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या दोघींनी मिळून ‘तेजाज्ञा’ नावाचा डिझायनर कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. या दोघींचा हा ब्रँड इंडस्ट्रीमध्ये आणि लोकांमध्ये देखील खूपच प्रसिद्ध आहे.
गिरीजा ओक- ‘फ्रेश लाईम सोडा’
गिरीजा ओक गोडबोले हे केवळ मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीमधलं एक मोठ्ठ नाव. गिरीजाचा ‘फ्रेश लाईम सोडा’ नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. जेन्टस क्लोथिंग आणि कपल ट्विनिंग ही या ब्रँडची खासियत आहे.
अपूर्वा नेमळेकर ‘अपूर्वा कलेक्शन’
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड असून, ‘अपूर्वा कलेक्शन’ असे त्याचे नाव आहे. अपूर्वाला दागिने परिधान करण्याची आवड तर आहेच, परंतु तिला दागिने डिझाईन करायला देखील आवडतात.
निवेदिता सराफ- ‘हंसगामिनी’
निवेदिता सराफ या एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिका देखील आहेत. ‘हंसगामिनी’ हा त्यांचा साड्यांचा ब्रॅन्ड असून त्या स्वत: साड्या डिझाइन देखील करतात. ग्राहकांना कमी किमतीमध्ये डिझायनर साड्या उपलब्ध करुन देणे हा ‘हंसगामिनी’चा उद्देश आहे.
क्रांती रेडकर- ‘झिया-जायदा’
अभिनेत्री क्रांती रेडकर मराठी कलाक्षेत्रामधील मोठं नाव आहे. तिने आपला स्वतःचा कपड्याचा बँड सुरु केला आहे. आपल्या मुलीच्या नावाने तिने ‘झिया-जायदा’ नावानं तिनं हा ब्रँड सुरू केला आहे.