हे राजकारणी मीडियात जाऊन जाहीरपणे… उर्फीचं ट्वीट पुन्हा चर्चेत

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद सध्या तिच्या कपड्यांमुळे वादात सापडली आहे. याप्रकरणी मागील अनेक दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये सोशल मीडियावरून शाब्दिक वाद सुरु आहेत. 13 जानेवारीला उर्फीने महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उर्फीने राज्य महिला आयोगाला पत्र पाठवून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती.

मंगळवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. तसेच यावर मुंबई पोलिस आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या आदेशानंतर उर्फीने चाकणकरांचे ट्वीट शेअर करत पुन्हा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.

ज्यात तिने लिहिलंय की, “बलात्काराची प्रकरणं प्रलंबित असतील तरी हे राजकारणी मीडियात जाऊन जाहीरपणे एखाद्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देतात आणि त्याचे कारण म्हणजे महिलेने घातलेले कपडे,” असं उर्फीने लिहिलंय.

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये उर्फीने लिहिलंय की, “जे योग्य आहे त्यासाठी उभे राहिल्याबद्दल @ChakankarSpeaks आणि @Maha_MahilaAyog यांचे मी आभार मानू शकत नाही. तुम्हाला जर माझे कपडे आवडत नसतील तरी तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही आणि मला मारण्याची सार्वजनिकपणे धमकी देऊ शकत नाही,” असा टोला उर्फीने चित्रा वाघांना लगावला आहे.

 


हेही वाचा :

मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी; उर्फी जावेदने महिला आयोगाकडे पाठवलं पत्र