हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वात आता जोरदार लगीनघाई सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक लोकप्रिय कलाकार यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकले. तर अनेक कलाकार आता लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी- अजिंक्य यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. अभिनेत्री पूजा सावंत हिनेदेखील आपला साखरपुडा उरकून घेतला. आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सिद्धार्थ बोडके याच्यासोबत ती लग्न करणार आहे. त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये यापूर्वीही व्हायरल झाले होते. मात्र अखेर त्यांनी एक फोटो शेअर करत आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. आता त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. त्यांचं दुसरं केळवण झालं आहे.
तितिक्षा-सिद्धार्थचं केळवण
यापूर्वी ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुल हिने या दोघांचं केळवण केलं होतं. आता तितिक्षाच्या मित्राने आणि भावाने त्यांचं केळवण केलं आहे. सानील सावंत व अभिनेत्रीचा भाऊ साईश तावडे यांनी तितीक्षा-सिद्धार्थ यांचं केळवण साजरं केलं आहे. तितीक्षा- सिद्धार्थ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे केळवणाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये छान फुलांची सजावट करून सजवलेल्या ताटामध्ये गोड पदार्थ व मिठाई ठेवलेले पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर छान रांगोळी काढून साग्रसांगीत हे केळवण साजरं करण्यात आलं.
तितिक्षा आणि सिद्धार्थ यांची ओळख ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेच्या दरम्यान झाली होती. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते आणि नुकतीच त्यांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली. आता हे दोघे विवाहबंधनात कधी अडकणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तितीक्षा सध्या झी मराठी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे. तर सिद्धार्थ नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात मराठीतील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली.