हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सला आवडत नव्हती इरफान खान यांची ‘ही’ गोष्ट!

irfaan khan in inferno with tom hanks

फक्त बॉलिवुडच नाही तर हॉलिवूड आणि इतरही काही भाषांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते इरफान खान यांचं आज सकाळी निधन झालं आहे. या घटनेनंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर इरफान खान यांनी हॉलिवुडचा सुप्रसिद्ध कलाकार टॉम हँक्ससोबत इन्फर्नो या चित्रपटामध्ये काम केलं होतं, त्या वेळची टॉम हँक्सची एक आठवण समोर आली आहे. टॉम हँक्सला इरफान खान यांची एक गोष्ट आवडत नव्हती. इन्फर्नोच्या सेटवर देखील त्यांनी आलेलं त्याला आवडत नव्हतं. पण सिनेमा सोबत करायचा होता म्हणून त्यानं सगळं अॅडजस्ट केलं. पण त्याला इरफान खान यांची कोणती गोष्ट आवडत नव्हती, याचा खुलासा त्याने नंतर एका मुलाखतीदरम्यान बोलताना केला.

कूलेस्ट गाय…!

इन्फर्नोमध्ये इरफान खान यांनी टॉम हँक्ससोबत चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र, याबदद्ल सांगताना टॉम हँक म्हणतो, ‘मला इरफान खानची ही एक गोष्ट आवडत नव्हती. मला नेहमी वाटायचं की इन्फर्नोच्या सेटवर मीच एकमेव कूल गाय आहे म्हणून. तिथला प्रत्येकजण मी काय सांगतोय, त्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेऊन होते. प्रत्येकाला माझ्यासोबत राहायला आवडत होतं. पण फक्त इरफान खान तिथे येईपर्यंत. एकदा तो तिथे आला, की हे सगळं त्याच्या बाबतीत व्हायचं आणि तो सेटवरचा सगळ्यात कूल गाय व्हायचा!’

टॉम हँक्सला इरफानसारखं व्हायचं होतं…!

या सगळ्या गोष्टीवर टॉम हँक म्हणतो, ‘मी जेव्हा सेटवर इरफान खानशी बोललो, मी त्याला सांगितलं की तुझ्याकडून जे जे मला शक्य होईल, ते सगळं मी चोरून घेणार आहे. मी चित्रपटांमध्ये शांतपणे बोलायला सुरुवात करणार आहे. छानपैकी सूट घालायला देखील सुरुवात करणार आहे. आता माझ्या वाक्यांमधला शेवटचा आवाज मी एकदम संथ करणार आहे. आणि हे सगळं करूनही मी त्याला कॉपी करण्याचा खूपच सामान्य प्रयत्न करायचो’.


हेही वाचा – इरफान खानच्या हॉलिवूडमधल्या गाजलेल्या व्यक्तीरेखा आणि सिनेमे!