घरमनोरंजनटोटल धमाल

टोटल धमाल

Subscribe

येडपटांच्या सरधोपट विनोदांचा धमालपट

चर्चा करण्यासारखी कथा नसल्याने केवळ पटकथा आणि संवादातून विनोद निर्मितीचा प्रयत्न काही प्रसंगात डोईजड होतो. चित्रपटाच्या पटकथेचा बराचसा भाग आयतं घबाड मिळवण्यासाठीच्या प्रवासातल्या विनोदी प्रसंगानी भरलेला आहे. पैशांना आसुसलेली ही चित्रविचित्र लहरींची मंडळी चार्टर्ड विमान, भंगारातलं हेलिकॉप्टर, चित्रविचित्र गाड्यांतून हा पैसा मिळवण्यासाठी चित्रविचित्र ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे प्रासंगिक विनोद निर्मितीसाठी केलेला हा प्रयत्न अधूनमधून कमालीचा केविलवाणा ठरतो.

या आधीचा इंदर कुमारच धमाल ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्या पुढच्या टोटल धमालचा अंदाज आला असेलच. कथानकात नाविन्य नाही. कोट्यावधी नोटा मिळवण्यासाठीची ही स्पर्धा पहिल्या धमालइतकीच पुन्हा इंदर कुमारने रंगवली आहे. कॅश, पैसा पैसा असे काही सिनेमे अशाच विषयांवर येऊन गेले आहेत. कुठलीही कल्पना नसताना आयत्या मिळणार्‍या घबाडाची माहिती मिळाल्यावर फुकटच्या पैशांचा हव्यास लागतो. मग ही रक्कम मिळवण्यासाठी केले जाणारे अनाकलनीय प्रयत्नांचा पट म्हणजे इंदरचे धमालपट…मात्र आधीच्या धमालइतकीच धमाल, टोटल धमालमध्ये केली गेली आहे. ही धमाल पडद्यावर येण्यासाठी अभिनेत्यांची फौज इथंही आहे. अजय देवगण, माधुरी दिक्षीत, अर्शद वारसी, जावेद जाफरी, अनिल कपूर, रितेश देशमुख, इशा गुप्ता, बोम्मन इराणी, संजय मिश्रा, महेश मांजरेकर, विजय पाटकर, राजपाल यादव, संजय दत्त आणि जॉनी लिव्हर, अशा अनेकविध कलाकारांचे येऊन जाणे, आवाज आणि व्यक्तीरेखांनी धमालचा पडदा भरलेला आहे. ही मिसळ, भेसळ बेमालूम जमली असल्याने अनाकलनीय विनोदपटांच्या रांगेत टोटल धमाल फिट्ट बसतो. केवळ मनोरंजन, टाईमपास आणि पुरेपूर हसवणुकीसाठीचा टोटल धमाल पैसा वसूल कॉमेडीपट आहे. इथं विनोदाच्या दर्जाबाबत चर्चा नको, हिंदी पडद्यावर पाचकळ विनोदपट याआधी आलेले आहेत. धमाल त्यातल्या त्यात बर्‍यापैकी संयम ठेवून बनवलेला आहे.

- Advertisement -

चर्चा करण्यासारखी कथा नसल्याने केवळ पटकथा आणि संवादातून विनोद निर्मितीचा प्रयत्न काही प्रसंगात डोईजड होतो. चित्रपटाच्या पटकथेचा बराचसा भाग आयतं घबाड मिळवण्यासाठीच्या प्रवासातल्या विनोदी प्रसंगानी भरलेला आहे. पैशांना आसुसलेली ही वेड्यावाकड्या लहरींची मंडळी चार्टर्ड विमान, भंगारातलं हेलिकॉप्टर, चित्रविचित्र गाड्यांतून हा पैसा मिळवण्यासाठी चित्रविचित्र ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे प्रासंगिक विनोद निर्मितीसाठी केलेला हा प्रयत्न अधूनमधून कमालीचा केविलवाणा ठरतो. आधीच्या धमालमध्ये संवादातून विनोदाला बरीचशी जागा होती. टोटल मध्ये ती जागा एकामागोमाग येणार्‍या प्रसंगांनी भरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पटकथेला वेग मिळल्याने प्रसंगावर विचार करण्याचा त्रास न घेता केवळ हसण्याशिवाय प्रेक्षकांपुढे पर्याय राहात नाही. लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या प्रेक्षकांचा विचार करून केवळ बॉक्स आफिसची समीकरणं जुळवून टोटल धमाल बनवलेला आहे. त्यामुळेच सोनाक्षीचं आताचं मुंगळा गाणं किंवा प्राणीसंग्रहालयातला निर्माण झालेला गोंधळ विनोदनिर्मितासाठी जाणीवपूर्वक बनवलेला असतो.

रोहीत शेट्टीचे विनोदपट किंवा इंदर कुमारचे धमालपट सारख्याच सरधोपट मार्गाने जातात. प्रियदर्शनच्या विनोदपटांशी त्याची तुलना होत नाही. तरीही टोटल धमाल पडद्यावर पुरेशी धमाल आणतो. बराचसा चित्रपट संगणकावर बनवलेला असल्याने प्रसंगातील कुठल्याही अचाट कल्पनाशक्तीची मर्यादा इथं राहत नाही. पण हे करताना चित्रपट रटाळ होण्याचा धोका होता तो दिग्दर्शक इंदर कुमारने कौशल्याने टाळला आहे. डोंगरदर्‍या, जंगलपरिसर, हॉटेल, रस्त्यातून कॅमेरे फिरत राहतात. कथानक कुठे घडतंय याचा उलगडा नसतो, ते केवळ पडद्यावर घडतंय, म्हणून पाहायचं इतकंच प्रेक्षकांच्या हातात राहतं. दिक्षितांची माधुरी आणि कपुरांचा अनिल बर्‍याच वर्षांनी एकत्र पडद्यावर दिसल्याने ३० वर्षापूर्वीच्या त्यांच्या सुवर्णकाळ पडद्यावर अनुभवलेल्या प्रेक्षकांना काळाच्या ओघात झालेले बदल धमाल पाहाताना जाणवतात. आयटम साँग, ओढून ताणून आणलेले विनोदी संवाद यापुढे हा धमालही जात नाही. जुन्या धमालमध्ये असलेला जावेद जाफरी इथंही वेंधळाच आहे. तर अर्शद आणि रितेश देशमुख या धमालमध्येही कथानकाला पुरेसे ‘बावळट’आहेत. हे माकडचाळे कमी पडतात म्हणून चित्रपटांत प्राण्यांनाही घेतलं आहे. या माकडचाळ्यांच्या स्पर्धेने मध्यंतरानंतरचा पडदा भरलेला असतो.

- Advertisement -

नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देण्याचा कोट्यवधीचा व्यवहार बोम्मन इराणी करतोय, हा डॉन आहे की पोलीस कमिशनर हा डोईजड सस्पेन्स आहे. ही खबर उरलेल्या मंडळींना लागते, त्यानंतर या पैशांवर डल्ला मारण्याच्या प्रयत्नांचा पट म्हणजे टोटल धमाल, आता यात ते किती यशस्वी होतात. हे पडद्यावर पाहायला हवं. टोटल धमाल नावासारखाच पडद्यावर धमाल आणतो. कथा, पटकथा, संवाद, प्रसंग असं कुठलंही टेन्शन दिग्दर्शकाने घेतलेलं नाही. त्यामुळे प्रेक्षकांनीही ते घेऊ नये, त्यामुळेच टोटल धमाल टोटल पैसा वसूल कॉमेडीपट होतो. जावेद जाफरी लक्षात राहतो. तर माधुरी, अनिलचे अभिनयातले सूर पुन्हा जुळलेले आहेत. रितेश देशमुखचे संवाद धमाल रंगले आहेत. थोडक्यात पडद्यावर येड्यांची जत्रा भरलेली आहे. येडपटपटात नकळत प्रेक्षकही सामील होतो, हे इंदर कुमारचं यश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -