‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या शुटिंगला सुरुवात होणार!

gopal shetty
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या शुटिंगला सुरुवात होणार!

मनोरंजन क्षेत्रातील सर्व मालिकेवर कोरोनाचे सावट आले होते. यामुळे जवळपास अडीच महिने मालिकेचे चित्रिकरण बंद होते. त्यामुळे गेले कित्येक दिवस प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या मालिका पाहायला मिळत नव्हत्या. पण गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रिकरणासाठी परवानगी दिल्यानंतर अनेक चॅनल, निर्माते यांनी मालिकांच्या चित्रिकरणाला सुरुवात करत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात सर्वांचा आवडता राणादा आणि अंजलीबाई नव्या एपिसोडसह भेटायला येण्याची शक्यता आहे. लवकरच झी मराठीवर अनेकांची आवडती मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रिकरण कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे. असे एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून अनेक चॅनेलवर जुन्या मालिका दाखवल्या जात होत्या. पण आता पुन्हा एकदा नवीन एपिसोडसह आपल्या आवडतीच्या मालिका प्रसारित होणार आहेत. पुण्या-मुंबईहून ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकार कोल्हापुरात चित्रिकरणासाठी दाखल झाले आहेत.

यावेळेस पहिल्यांदा या मालिकेतील सर्व कलाकारांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. ही टेस्ट मालिकेतील सर्व कलाकारांची निगेटिव्ह आली आणि त्यांना नियमानुसार १० दिवस हॉटेलमध्ये तर ४ दिवस होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर पुन्हा एकादा सर्व कलाकारांची स्वॅब टेस्ट घेण्यात येणार आहे. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. जर सोमवारपासून मालिकेचे चित्रिकरण सुरू झाले तर पुढच्या आठवड्यात तुम्हाला ही मालिका पाहता येणार आहे.