घरमनोरंजन‘स्लिदर’ : बी-ग्रेड चित्रपटांना दिलेला होमाज

‘स्लिदर’ : बी-ग्रेड चित्रपटांना दिलेला होमाज

Subscribe

जेम्स गन सुरुवातीला बराच काळ इंडी लेव्हलवर काम करताना दिसून यायचा. जे त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चित्रपटाच्या विषयांना साजेसं होतं. कारण त्या इंडी प्रकारात त्याच्या चित्रपटांतील विचित्रपणा कायम राखला जायचा. त्याच्या कल्पनेला कुठल्याही स्टुडिओ एक्सिक्युटिव्हने लादलेली बंधनं नसल्याने स्वातंत्र्य लाभून त्यातील गोअर हिंसक दृश्यं, वैचित्र्यपूर्ण पात्र आणि त्यांच्या जोडीला असलेला विनोद अबाधित रहायचा. ‘स्लिदर’ हा काहीशा ओल्ड-स्कूल हॉरर प्रकारातील, त्याच्या वैचित्र्यपूर्ण शैलीचा अस्सल अनुभव आहे.

सुरुवातीलाच साठ-सत्तरच्या दशकातील मॉन्स्टर मुव्हीज किंवा एलियन फिल्म्समध्ये दिसायचं तसं परकीय जीव पृथ्वीवर येण्याचं टिपीकल दृश्य दिसतं. ज्यादरम्यान कंटाळा येत असल्याने स्पीड गनने उडत्या पक्षांची गती मोजणारे आणि ड्युटीवर असताना पेंगणारे पोलिस अधिकारी दिसतात. ज्याद्वारे छोटेखानी शहराची सेटिंग उभारली (आणि स्पष्ट) केली जाते. लगेचच सलग दृश्यांमधून महत्त्वाच्या पात्रांची ओळख होऊन चित्रपटाच्या विनोदाच्या आणि एकूणच अ‍ॅब्सर्ड शैलीचं दर्शन होतं.

सुरुवातीच्या दृश्यातील उल्केवरून आलेला परजीवी जंगलात भटकत असलेल्या ग्रँटच्या (मायकल रूकर) शरीरात प्रवेश करतो. हा परजीवी त्याच्या मदतीने ग्रँटची मैत्रीण ब्रेंडा आणि इतरही अनेक लोकांनाही आपल्यासारखं बनवत जातो. ज्याद्वारे त्यांना कच्च्या मांसाची न संपणारी भूक निर्माण होऊ लागते. एकीकडे तळघरात लपवलेलं मांस, जंगलात लपवलेली ब्रेंडा आणि इतरही अनेक पाहण्यास त्रासदायक, गोअर दृश्यांतून ‘स्लिदर’चा प्रवास सुरू असतो. तर दुसरीकडे ग्रँटची पत्नी, स्टर्लाचा (एलिझाबेथ बँक्स) वेगळाच लढा सुरू आहे. तिने काहीशा आर्थिक, मानसिक द्वंद्वातून ग्रँटशी लग्न केलं होतं. असं असलं तरी ती अजूनही त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. इतकं की समोर अतर्क्य, अशक्यप्राय घटना होत असताना, त्या एलियनच्या ग्रँटच्या शरीरावरील पूर्ण नियंत्रणानंतरही ती जणू काही झालंच नाही अशा आर्विभावात वावरते आहे. सोबत शालेय वयापासूनच कायम तिच्याकडे आकर्षित असलेला शेरीफ बिल पार्डी (नेदन फिलियन) हा खर्‍या अर्थाने फ्रंटफूटवर असलेला नायकही आहे.

- Advertisement -

तर सदर परजीवी (कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला त्रासदायक वाटणार्‍या) आपल्या उद्देशात सफल झाल्यावर सदर शहरातील लोकांवर ‘स्लिदर’चा हल्ला होऊन, झाँबीसदृश्य जीव शहराचा ताबा घेतात. ज्यामुळे उत्तरार्धात शेरीफ पार्डी, त्याचे सहकारी आणि स्टर्लाने त्यांच्याशी दिलेला लढा कथेच्या केंद्रस्थानी येऊन चित्रपटाला काही प्रमाणात झाँबी चित्रपट प्रकारचे वळण लाभते.

‘स्लिदर’ काही सर्वार्थाने परिपूर्ण असलेला चित्रपट नाही. तसेच तो सर्व स्तरांवरील प्रेक्षकाला आवडेल किंवा पूर्ण पाहता येईल अशातलाही भाग नाही. ज्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातील ऐंशीच्या दशकातील ‘फ्रॉम डस्क टिल डॉन’सारख्या चित्रपटांत असणार्‍या दृश्यांना समांतर शैली आहे. त्यात एक मूलभूत रॉनेस आहे. त्यात प्रभावी वाटतील अशी हॉरर दृश्यं आहेत. त्यात काही विचित्र मात्र ओरिजनल अशा संकल्पना आहेत. ज्या त्याच्या एकूण परिणामात भर घालतात.पारंपरिक मॉन्स्टर हॉरर चित्रपटांतील पात्रांना बी ग्रेड चित्रपटांतील निर्मितीमूल्यं, गोअर दृश्यं, प्रचंड हिंसा, स्क्रीनभर पसरणारी रक्त, विचित्र आकारांच्या प्राण्यांची दृश्यं अशा सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे ‘स्लिदर’. ज्यात अनेक वेगवेगळ्या, वैचित्र्यपूर्ण कल्पना आकार घेतात.

- Advertisement -

ज्यातील एक पुढे जाऊन ‘गार्डियन्स ऑफ द गॅलक्सी’मध्येही दिसून येते. ती म्हणजे परग्रहवासीने वेगवेगळ्या ग्रहांवर जाऊन प्रजनन करणे, आणि संपूर्ण विश्व काबीज करण्याची इच्छा बाळगणे. ज्याद्वारे इंडी फिल्म्सच्या गनसारख्या कल्पक दिग्दर्शकांना योग्य ते बजेट देऊन आपल्या कल्पनांचा विस्तार करू दिला तर काय निर्माण होऊ शकते याचा अनुभव येतो. अर्थात ‘स्लिदर’मधील विनोद किंवा विचित्रपणा हा ‘गार्डियन्स’च्या विश्वातील नक्कीच नाही. तो मुळातच बी ग्रेड चित्रपटांच्या प्रेक्षकाला सुखावण्यासाठी हेतूपुरस्सर निर्माण करण्यात आलेला आहे.ज्यात तो यशस्वी ठरून एक परिणामकारक, प्रभावी चित्रपट समोर येतो. जो एखाद्या वीकेंडला पाहण्याची हॉरर फ्लिक म्हणून उत्तम पर्याय आहे.

– अक्षय शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -