‘छावा’ या सिनेमाचा बुधवारी 22 जानेवारी रोजी मुंबईतील प्लाझा थिएटरमध्ये ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी ‘छावा’ सिनेमातील मुख्य स्टारकास्ट आणि मेकर्सची टीम उपस्थित होती. या सिनेमात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या मध्यवर्ती भूमिकेत तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. रश्मिकाने आजवर विविध भाषिक अनेक सिनेमे केले. मात्र, या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच ऐतिहासिक पात्र साकारणार आहे. या सोहळ्यात रश्मिकाने आपल्या रिटायरमेंट प्लॅनबद्दल विधान केले आहे. जाणून घेऊया रश्मिका नेमकं काय म्हणाली?
‘छावा’ सिनेमाच्या माध्यमातून रश्मिकाला महाराणी येसूबाई भोसलेंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ट्रेलर लॉन्च दरम्यान आपल्या पहिल्या ऐतिहासिक सिनेमाबाबत तिने आनंद व्यक्त केला आहे. शिवाय स्वतःच्या करिअरविषयी बोलताना तिने असं काही वक्तव्य केलं की, ते जोरदार चर्चेत आलं आहे. ‘या भूमिकेनंतर मी आनंदाने रिटायर होऊ शकते..’, असं ती यावेळी म्हणाली. या विधानामुळे रश्मिका अभिनय क्षेत्रातून एक्झिट घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तिचे विधान जरी गंभीर असले तरी तिने हे मस्करीत म्हटले आहे. ट्रेलर लाँचदरम्यान रश्मिकाने तिला मिळालेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी दिग्दर्शकांचे आभार मानले. यावेळी तिने इतक्या मोठ्या आणि महत्वाच्या भूमिकेनंतर मी खुशाल निवृत्त होऊ शकते, असे हसत हसत म्हटले. रश्मिका पुढे म्हणाली, ‘दाक्षिणात्य भागातून आलेल्या मुलीला महाराणी येसुबाई भोसले यांची अत्यंत महत्वाची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी आणि खास गोष्ट आहे. खरोखरचं माझ्यासाठी ही अत्यंत आदराची बाब आहे. यापेक्षा आयुष्यात मला आणखी काहीच नको. मी लक्ष्मण सरांनाही म्हटले आहे की, छावातील या भूमिकेनंतर मी आनंदाने रिटायर होऊ शकते. खरतर मी पटकन रडत नाही. पण हा ट्रेलर पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं.
येसुबाईंच्या भूमिकेविषयी बोलताना रश्मिका म्हणाली, ‘मला लक्ष्मण सरांनी जेव्हा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेची ऑफर दिली तेव्हा मी थक्क झाले. त्यावेळी कोणत्याही संदर्भाशिवाय केवळ एका कथेच्या आधारावर ही प्रभावी व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. अशावेळी या भूमिकेसाठी मी दिग्दर्शकांवर पूर्णपणे डोळे मिटून विश्वास ठेवला आणि स्वत:ला या भूमिकेत मनापासून समर्पित केले. मला भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली, सराव करावा लागला आणि तो मी केला’. दरम्यान, छावा हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही पाहा –