घरमनोरंजनलक्ष्मणरेषा ओलांडली

लक्ष्मणरेषा ओलांडली

Subscribe

थोडीशी मेहनत घेतली तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करणे तसे सोपे झालेले आहे. पण सातत्याचा ज्यावेळी प्रश्न उद्भवतो त्यावेळी मात्र त्याच कलाकाराला भरपूर मेहनत करावी लागते. ही चित्रपटसृष्टी एखाद्या कलाकाराला अलिप्त ठेवू शकते. तसेच त्याचे भवितव्यही घडवू शकते. फक्त आपला आवाका लक्षात घेऊन या क्षेत्रात पदार्पण करणे गरजेचे आहे. लक्ष्मण उतेकर हे नाव सुजाण प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले आहे. कॅमेरामन ते दिग्दर्शक असा त्याचा प्रवास आताच्या प्रेक्षकांना माहिती असला तरी पदार्पणातच त्याने पडेल ती कामे केलेली आहेत. त्याची ही महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन याच क्षेत्रातल्या अनेकांनी त्याला वेगवेगळे मार्ग सुचवले. महत्त्वाचे म्हणजे त्याचे रितसर शिक्षण घेऊन लक्ष्मणने ते ते क्षेत्र जाणून घेतलेले आहे. स्टीलफोटोग्राफी करत असताना व्हिडिओ कॅमेरा त्याच्या हाती कधी लागला हे त्यालाच उमगले नाही. ‘लुका छुप्पी’ हा चित्रपट पुढल्या महिन्यात प्रदर्शित होत आहे, त्याचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरने केलेले आहे.

‘बॉस’, ‘तेवर’, ‘डिअर जिंदगी’ अशा कितीतरी हिंदी चित्रपटांच्या छायाचित्रणाचे काम त्याने केलेले आहे. पण खर्‍या अर्थाने त्याचे नाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचले ते ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटामुळे. त्याला दोन-तीन कारणे आहेत. एकतर श्रीदेवी या अभिनेत्रीचे बर्‍याच वर्षांनंतर या चित्रपटातून पुनरागमन झाले. शिवाय गौरी शिंदेचा हा चित्रपट होता. अभिनेत्री, दिग्दर्शन यासाठी या चित्रपटाचे जसे कौतुक झाले तसे लक्ष्मणच्या छायाचित्रणाचेही झालेले आहे. मराठी निर्मात्याला लक्ष्मणचे हे वेगळेपण अधिक भावले. त्याच्यावरच दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली तर काही चांगले घडू शकते या एका हेतूने ‘टपाल’, ‘लालबागची राणी’ या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी लक्ष्मणवर सोपवली होती. ‘टपाल’ने जागतिक पातळीवरील महोत्सवात अनेक पुरस्कार प्राप्त केलेले आहेत आणि आता तर ‘लुका छुप्पी’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक या नात्याने वेगळे माध्यम हाताळतो आहे. कार्तिक आर्यन, कीर्ती सनॉन यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -