मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेत बादशाह म्हणून ओळखले जाणारे रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे 99’ हा चित्रपट येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत 16 मे 2025 रोजी सिनेगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते करण्यात आले ह्या प्रसंगी निर्माते जोगेश भूटानी ह्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन राजदत्त ह्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले. (Upcoming Marathi Movie April May 99 poster unveiled by director Rajdutt)
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चार तरुण त्यांच्या सायकलींसोबत उभे असल्याचे दिसते. या तरुणांच्या वर निळेशार आकाश आणि समोर समुद्र पाहायला मिळत आहे. पोस्टरवरून असे दिसते की, हा चित्रपट प्रेक्षकांना मैत्री, स्वप्नं, आणि तारुण्याच्या भावविश्वात घेऊन जाणारा असेल. ‘एप्रिल मे 99’ असे नाव असल्याने हा चित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीतील कुटुंबातील लहान मोठ्या सर्वांच्या सुट्टीतील रम्य आठवणींशी जोडला जाणार आहे. चित्रपटात कलाकार कोण असतील? हे अजून गुलदस्त्यातच आहे.
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, ‘श्रीवर्धनमध्ये आमचा मापुस्कर कुटुंबाचा एक सिनेमा हॉल होता. तो सिनेमा हॉल आम्हा दोन भावांसाठी जणू एक चित्रपट शाळाच ठरला. तिथे राजदत्त जींचे चित्रपट पाहत आम्ही मोठे झालो आणि इतकेच नाही तर आम्ही त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे पोस्टर श्रीवर्धन आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन चिकटवायचो. आज आम्ही राजदत्त जींच्या हस्ते रोहनच्या पहिल्या चित्रपटाचे ‘एप्रिल मे 99′ चे पोस्टर रिलीज करत आहोत. यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो? त्यांच्या शुभेच्छांमुळे आमच्या प्रवासाला एक वेगळे बळ मिळाले असून त्यांचे हे आशीर्वाद आम्हाला कायम प्रेरित करतील’.
लेखक, दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, ‘आज मी दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर माननीय राजदत्तजी यांच्या हस्ते प्रदर्शित करतोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रवासात आम्ही अनुभवलेले क्षण, चित्रपटांची जादू आणि कलेची आस हे सर्व एकत्र होऊन या नव्या प्रकल्पाला आकार देत आहेत. नेहमी प्रमाणे प्रेक्षकांच्या प्रेमाने या चित्रपटाला पुन्हा पाठिंबा मिळेल, अशी खात्री आहे. राजदत्त सरांचे आशीर्वाद आम्हाला पुढील प्रवासासाठी उर्जा देतील याची मला पूर्ण खात्री आहे’.
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स , थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.
हेही पहा –
Chhaava Box Office Collection : विकी कौशलच्या छावाने ओलांडला 300 कोटींचा टप्पा