ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन

Veteran actor Anupam Shyam passed away
ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचं निधन

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते अनुपम श्याम यांचं मुंबईत निधन झालं. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून अनुपम श्याम यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी ८ ऑगस्टला त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

अनुपम श्याम यांना गेल्या अनेक दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होत होता. यासंबंधी उपचारांसाठी त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाले. त्यामुळे दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘दिग्गज अभिनेता अनुपम श्याम यांचं मल्टिपल ऑर्गन फेलिअरमुळे निधन झालं. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टी आणि टीव्ही जगताचं मोठं नुकसान आहे.’

अनुपम श्याम ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ टीव्ही मालिकेत साकारलेल्या भूमिकेसाठी ओळखलं जातं. यामध्ये त्यांनी ठाकूर सज्जन सिंहची भूमिका साकारली होती. ते खऱ्या आयुष्यातही याच नावाने ओळखले जातात. ‘सदरादी बेगम’, ‘बँडिट क्वीन’, ‘हजार चौरासी की माँ’, ‘दुश्मन’, ‘सत्या’, ‘दिल से’, ‘जख्म’, ‘प्यार तो होना ही था’, ‘कच्चे धागे’, ‘नायक’, ‘स्लमडॉग मिलेनियर’ आणि मुन्ना सायकल सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.