घरताज्या घडामोडीज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने निधन

Subscribe

वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने रामदास कामत यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

नाटकाच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि उत्तम गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचे काल, ८ जानेवारी रोजी रात्री ९.४५ वाजता विलेपार्ले येथील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने रामदास कामत यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा डॉक्टर कौस्तुभ कामत ,सून डॉ. संध्या कामत आणि नातू अनिकेत आणि नातसून असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यविधी पारसीवाडा स्मशानभूमीत अंधेरी पूर्व येथे पार पडले.

ज्येष्ठ गायक आणि अभिनेते पंडित रामदास कामत मूळचे गोव्याचे होते. लहानपणापासून रामदास कामत यांना वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे मिळाले. कामत यांनी नाट्यसंगीताचे शिक्षण घेऊन पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी, प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्याकडून नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने पंडित रामदास कामत यांनी संगीत रंगभूमीवरील पाऊल ठेवले. ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत मदनाची मंजिरी’, ‘संगीत एकच प्याला’, ‘संगीत मंदारमाला’ अशा अठरा संगीत नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे.

- Advertisement -

नोकरी सांभाळून रामदास कामत यांनी तब्बल साठ वर्ष आपली सांगीतिक कारकिर्द मनापासून जपली. त्यांना २०१५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. मग २००९ साली अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. रामदास कामत यांनी शेवटपर्यंत संगीताची आवड जपली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

‘ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांच्या निधनाने रंगभूमीवरील संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार हरपला आहे. मूळचे गोव्याचे असलेल्या पंडित रामदास कामत यांनी लहानपणीपासून त्यांचे वडिल बंधू उपेंद्र कामत यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी, प्रभाकर कारेकर, भालचंद्र पेंढारकर यांच्या सोबत काम करत त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून संगीत रंगभूमीची अविरतपणे सेवा केली. त्यांच्या निधनाने संगीत आणि कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Restriction : कसं परवडणार? संदीप पाठकने निर्बंधांवर व्यक्त केला संताप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -