अभिनेता विकी कौशलचा छावा सिनेमा या वर्षातला पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. रिलीजनंतर आठवड्याभरात या सिनेमाने 224.84 कोटी रुपयांची कमाई करून रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. सिनेमातील विकी कौशलच्या अभिनयाने प्रेक्षक वर्ग भारावून गेलाय आणि जो तो त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतोय. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात अभिनेता विकी कौशल उभा आहे आणि एक महिला त्याची नजर काढताना दिसतेय. तर ही महिला कोण आहे? याविषयी जाणून घेऊया. (Vicky Kaushal Shared cutest video of ashatai adoring him after watching chhaava)
.. अन् विकीची दृष्ट काढली
सोशल मीडियावर एक महिला विकीची दृष्ट काढताना व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलाय की, ही महिला नक्की आहे तरी कोण? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओतील महिला दुसरं तिसरं कुणी नसून विकीच्या आयुष्यातील अत्यंत खास व्यक्ती आहे. ही महिला म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या घरात काम करणाऱ्या आशाताई आहेत. ज्यांनी विकीला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. दरम्यान, त्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला आणि घरी येऊन थेट विकीची दृष्ट काढली.
उभे राहा, नजर काढायची आहे..
हा व्हिडीओ अभिनेता विकी कौशलने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला आहे. सोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आशा ताईंनी मला उंचीने आणि आयुष्यात मोठं होताना पाहिलंय. कालच त्यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्या म्हणाल्या, ‘उभे राहा, नजर काढायची आहे तुमची…’. ही त्यांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे. त्या नेहमीच माझी काळजी करत असतात आणि माझ्या आयुष्यात त्या आहेत याचा मला खूप आनंद आहे’.
View this post on Instagram
‘छावा’ सिनेमाबद्दल अधिक सांगायचं तर, यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. दोघांच्याही अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान, सिनेमातील निगेटिव्ह रोलमध्ये अभिनेता अक्षय खन्ना झळकला आहे. त्याने मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारली आहे. त्यामुळे विकी, रश्मिकासोबत अक्षय खन्नाच्याही अभिनयावर प्रेक्षक फिदा झाले आहेत. माहितीनुसार, हा सिनेमा विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आहे.
हेही पहा –
Chhaya Kadam : PIFF मध्ये छाया कदम यांचा मानाच्या पुरस्काराने सन्मान