‘छावा’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतोय. ‘छावा’ रिलीज होऊन आठवडा झाला असला तरी प्रेक्षकांमध्ये या सिनेमाचं क्रेझ अद्याप कायम आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यात आला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींवर हा सिनेमा भाष्य करतोय. सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने घेतलेली मेहनत पाहून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. (Vicky Kaushal Shocking Transformation For Chhaava watch Viral Video)
सोशल मीडियावर मॅडॉक फिल्म्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी किती आणि कशी मेहनत घेतली? हे पहायला मिळतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपल्याला विकी कौशल त्याच्या शरीरयष्टीवर काम करताना दिसतोय. तसेच घोडेस्वारी, तलवारबाजीचे प्रशिक्षणदेखील घेताना दिसतोय. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी जे काही करण्याची गरज होती ते सगळं विकीने केलंय, याचा हा व्हिडीओ पुरावा आहे असे म्हटले तरी चालेल.
या व्हिडिओत अभिनेता विकी कौशल म्हणतोय, ‘छावासाठी ६ महिने तयारी करत होतो. अगदी बेसिक गोष्टींपासून सगळं शिकत होतो. घोड्याला माया लावणे, त्याच्यावर बसणे आणि रायडींग करण्याचे प्रशिक्षण घेत होतो. त्यासोबत प्रख्यात शिक्षकांकडून शस्त्रविद्या शिकलो. त्यावेळी ढाल, लाठी, तलवार चालवायला शिकलो. शिवाय ऍक्शन ट्रेनिंगसुद्धा घेतली. दररोज साधारण 6 ते 8 तास आम्ही कडक सराव करत होतो. रोज घरी गेल्यावर शरीरावर नव्या जखमा झालेल्या दिसायच्या. ज्या प्रकारची शिस्त माझ्या आयुष्यात मी अनुभवली ती याआधी कधीच नव्हती. एका काळानंतर मी खूप काही एकत्र शिकलोय हे लक्षात आलं. माझ्या खूप चांगल्या मसल्स तयार झाल्या होत्या. त्यावेळी लक्ष्मण सरांनी दिनु सरांना फोन करून म्हटले होते की, ‘मला माझा छावा मिळाला’.
‘छावा’ सिनेमाचा हा ‘बिहाइंड द सीन्स’ व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. जो तो या व्हिडिओवर कमेंट करताना विकी कौशलने घेतलेल्या परिश्रमाची आणि साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसतोय. ‘छावा’ या सिनेमाने आतापर्यंत 219.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी कौशलच्या कारकिर्दीत सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरला आहे.
हेही पहा –
Navri Mile Hitlerla : काश्मीरमध्ये फुलणार एजे लीलाचं प्रेमाचं नातं