वहिदा रहमान हे बॉलिवूड सिने जगतातील सन्मानित अभिनेत्रींपैकी एक नाव आहे. त्यांच्या दर्जेदार कलाकृतींमधून आजचे नवोदित कलाकार प्रेरणा घेतात. अशा या दिग्गज अभिनेत्रीचा आज 87 वा वाढदिवस आहे. यानिमित्त सोशल मीडियावर चाहते वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. एकेकाळी त्यांच्या सौंदर्यावर अख्खं बॉलिवूड फिदा होतं. पण वहीदा कुणावर फिदा होत्या? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Waheeda Rehman Birthday Know About Her Crush On Famous Actor)
साऊथपासून सुरु केली कारकिर्दीची सुरुवात
अभिनेत्री वहिदा रहमान यांनी अभिनय विश्वातील कारकिर्दीची सुरुवात साऊथ सिनेमांपासून केली. पण बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर त्यांना विशेष प्रेम मिळाले. आजही त्यांच्या सिनेमांची जादू कायम आहे. अशा या सदाबहार अभिनेत्रीचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाड़ामध्ये झाला. वहिदा रहमान यांनी हिंदीसोबत इंग्रजी आणि बंगाली सिनेमासाठी काम केले आहे. ‘चांदनी’, ‘नमक हलाल’, ‘कभी-कभी’, ‘तीसरी कसम’, ‘गाइड’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘पत्थर के सनम’, ‘चौदहवीं का चांद’, ‘काला बाजार’, ‘कागज के फूल’, ‘प्यासा’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये वहिदा यांनी काम केले आहे. हे सिनेमे आजही अगदी आवडीने पाहिले जातात.
डॉक्टर बनायचे होते पण..
वहिदा रहमान यांनी हिंदी सिनेमाचा एक काळ गाजवला आहे. त्यावेळी अभिनेत्री म्हणून टिकून राहण्यासाठी फार स्पर्धा होती. पण मधुबाला, मीना कुमारी, नर्गिससारख्या अभिनेत्रींसमोर वहिदा यांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं आणि टिकलंसुद्धा! आपल्या अदाकारीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. असे म्हटले जाते की, वहिदा यांना अभिनेत्री म्हणून काम करण्याची अजिबात ईच्छा नव्हती. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. पण वडिलांच्या निधनाने त्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. त्यानंतर वहीदा यांनी साऊथच्या सिनेमात अभिनय करण्यास सुरुवात केली. एनटी रामा रावच्या ‘जयसिम्हा’ या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली.
गुरुदत्तमूळे झाला बॉलिवूड डेब्यू
वहिदा रहमान या साऊथ सिनेविश्वात काम करत असताना दुसरीकडे गुरुदत्त आपल्या ‘सीआईडी’ सिनेमासाठी एका अभिनेत्रीचा शोध घेत होते. एका कार्यक्रमात त्यांनी वहिदा रहमान यांना पाहिलं आणि लगेच त्यांना स्क्रीन टेस्टसाठी बोलावून घेतलं. या स्क्रीन टेस्टनंतर वहिदा यांची निवड झाली आणि ‘सीआईडी’ सिनेमातून त्यांचा बॉलिवूड डेब्यू झाला.
फिल्म ‘प्यासा’तून मिळाली विशेष ओळख
वहिदा रहमान यांना हिंदी सिनेविश्वात फिल्म ‘प्यासा’तून खरी ओळख मिळाली. गुरुदत्त- वहिदा ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली. दरम्यान, त्यांच्या कथित अफेअरची खूप चर्चा झाली. त्यावेळी गुरुदत्त स्वतः अभिनेत्रीसाठी खास सीन्स लिहायचे. तेव्हा वहिदा- गुरुदत्त यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता. ज्याची कुणकुण लागताच गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त त्यांच्यापासून वेगळी राहू लागली. अखेर गुरुदत्त यांना पत्नी किंवा प्रेयसीपैकी एकीची निवड करावी लागली. ज्यात त्यांनी पत्नीला निवडले आणि वहिदापासून अंतर राखण्यास सुरुवात केली.
‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात होत्या वहिदा रहमान
वहिदा रहमान इतक्या सुंदर होत्या की अनेक अभिनेते तिच्यावर फिदा होते. पण वहिदा मात्र हिंदी सिनेमाचे हीमॅन अर्थात अभिनेता धर्मेंद्रवर भाळल्या होत्या. त्यांनी धर्मेंद्रसोबत ‘खामोशी’, ‘मन की आंखें’, ‘घर का चिराग’ अशा अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.
एका मुलाखतीत धर्मेंद्रने अभिनेत्रीबाबत एक किस्सा सांगितला होता. धर्मेंद्रने सांगितले, ‘जेव्हा मी चौदहवीं का चांद सिनेमा पाहिला तेव्हा माझ्या मनात कल्लोळ उठलेला. सगळं जग माझ्यावर फिदा असताना मी मात्र वहिदावर फिदा झालेलो. मी वहिदाच्या एका कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहिला होता. ज्यात काही अभिनेत्यांचे फोटो होते आणि तिला विचारले की यांपैकी तुमचा क्रश कुणावर होता? तेव्हा वहिदाच्या तोंडून निघाले, धर्मेंद्र! अरे मी विचार करत राहिलो जेव्हा मी फिदा होतो तेव्हा काय झालं होतं?’
सिनेविश्वात प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या वहिदा रहमान यांनी 1974 मध्ये अभिनेता शशी रेखीसोबत लग्न केले. शशी रेखी यांचे 2000 साली निधन झाले. पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या वहिदा यांनी काम सोडले नाही. तर ‘रंग दे बसंती’, ‘दिल्ली 6’ आणि ‘वॉटर’ यांसारख्या चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या. 2021 मध्ये वहिदा ‘स्केटर गर्ल’ या मराठी चित्रपटातही दिसल्या.
हेही पहा –
Urmila Matondkar : अफेअर- अपमान- एकटेपणा, एका चुकीने संपवलं रंगीला गर्लचं करिअर